18 August, 2026

*जलसंधारण दिनानिमित्त हिंगोलीत २१ ऑगस्टला ‘महा-वॉकेथॉन’*


हिंगोली, दि. १८ (जिमाका) : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त हिंगोली येथे शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता ३ किलोमीटर अंतराची ‘महा-वॉकेथॉन (Walk for Water)’ आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांनी केले आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्या शासन निर्देशानुसार १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे होणाऱ्या महा-वॉकेथॉनचे उद्घाटन (ता. २१ ऑगस्ट) अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, लोकसभा सदस्य नागेश पाटील आष्टीकर आणि हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रेखाताई बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार प्रज्ञाताई सातव, आमदार सईद खान, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे आणि आमदार संतोष बांगर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

 *‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’* 

महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सहभागी नागरिकांनी सकाळी ६ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. सकाळी ६.१५ वाजता वॉर्म-अप, ६.४५ वाजता मृद व जलसंधारणाची शपथ आणि ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनचा शुभारंभ होईल. सकाळी ८ वाजता वॉकेथॉनची सांगता होईल. त्यानंतर संदेश आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल.

महा-वॉकेथॉनसाठी QR कोडच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र, टी-शर्ट देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

*‘रिल्स’ स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस*

महा-वॉकेथॉनसोबतच १५ ते १९ ऑगस्टदरम्यान १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवकांसाठी जिल्हास्तरीय मृद व जलसंवर्धन रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही स्पर्धेची थीम आहे.

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, पारंपरिक जलसंधारण पद्धती तसेच नाविन्यपूर्ण संवर्धनाच्या कल्पना या विषयांवर रील तयार करता येईल.

रील ३० ते ६० सेकंदांची असावी. सुरुवातीला रीलचा उद्देश, सहभागीचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. रील स्वतःच्या सार्वजनिक Instagram खात्यावर पोस्ट करून #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरावा. विभागाच्या अधिकृत mahawalkathon2026 खात्याला टॅग करावे. त्यानंतर अधिकृत QR कोडद्वारे नोंदणी करून रीलची लिंक सादर करावी.

स्पर्धेतील प्रथम विजेत्यास २५ हजार रुपये, द्वितीय विजेत्यास १५ हजार रुपये आणि तृतीय विजेत्यास १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण २१ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रशाला मैदान, हिंगोली येथे होईल. महा-वॉकेथॉन आणि रिल्स स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी https://register.mahaevent.co.in यावर करता येईल.

माती व पाणी ही निसर्गाची अमूल्य संसाधने आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, युवक, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक व क्रीडा संघटना, उद्योग-व्यापारी संघटना, CSR भागीदार, रनिंग व सायकलिंग क्लब तसेच व्यायामशाळांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी गुप्ता आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्वळ यांनी केले आहे.

No comments: