*शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित*
- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना
हिंगोली, दि. १९ (जिमाका) : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत वयस्कर तसेच बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाताना आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत घेऊन जावे. योजनेच्या पोर्टलवरील संबंधित क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे कर्जखात्याची माहिती तपासल्यानंतर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. यादीमधील विशिष्ट क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे पोर्टलवर कर्जाबाबतची विस्तृत माहिती दिसेल. या माहितीनुसार मान्य, अमान्य पर्यायाची नोंद झाल्यानंतर ऑनलाइन बोटाच्या ठशांची नोंद घेण्यात येईल.
आधार प्रमाणीकरण करताना बोटांचा ठसा जुळत नसल्यास वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा. तीन प्रयत्नांनंतरही आधार प्रमाणीकरण झाले नाही, तर ‘"प्रमाणीकरण शक्य नाही" हा पर्याय निवडावा. यानंतर आपले सरकार सेवा केंद्र चालकाने स्वतःच्या बोटाने आधार प्रमाणीकरण करावे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रार तहसीलदारांकडे पाठविण्यात येईल.
तहसीलदारांकडून संबंधित शेतकऱ्याची कागदपत्रे (उदा.आधार कार्ड, बँकेचे पासबुक, 7/12 उतारा इ.) तपासून ओळख निश्चित केली जाईल. आधार क्रमांक आणि सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ओळख निश्चित झाल्यानंतर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमुक्ती योजनेचा लाभ ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येईल. वयस्कर तसेच बोटांचे ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाबाबत निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment