13 August, 2026

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धनावर तीन दिवसीय प्रशिक्षण

  

हिंगोली (जिमाका), दि. 13 : हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी, दूध उत्पादक, पशुपालक, महिला शेतकरी, युवक तसेच दुग्ध व्यवसाय करण्यास इच्छुक पात्र लाभार्थींना शास्त्रीय पद्धतीने दूध उत्पादन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापनाचे ज्ञान आणि कौशल्य मिळावे, या उद्देशाने येथील जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग आणि जिल्ह्यातील फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण दि. 18 ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीत केमिस्ट भवन सभागृह, खटकाळी रेल्वे पुलाजवळ, बांगर नगर, हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

या प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता  हे राहणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुधन विकास अधिकारी, बँक अधिकारी तसेच पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षक व साधन व्यक्ती यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे.

दुग्ध व्यवसायातील शास्त्रीय पद्धती, व्यवसाय व्यवस्थापन आणि पशुसंवर्धनाशी संबंधित आवश्यक ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित शेतकरी, दूध उत्पादक, पशुपालक, महिला शेतकरी व युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी डॉ. राजेसाहेब कल्ल्यापुरे (मो. 9518399323) तसेच डॉ. वाघमारे (मो. 8329178110) यांच्याशी संपर्क साधावा.

*****

No comments: