·
15 सप्टेंबरपर्यंत
ऑनलाइन अर्जाची मुदत; हिंगोली जिल्ह्यात मुला-मुलींसाठी एकूण 8 शासकीय वसतिगृहे
हिंगोली (जिमाका),
दि. 10 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांची
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. पात्र
व इच्छुक विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन
समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी
विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठीही अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर
2026 आहे.
हिंगोली जिल्ह्यात
सामाजिक न्याय विभागांतर्गत एकूण 8 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये हिंगोली
शहरात मुलांसाठी 1 व मुलींसाठी 2, वसमत येथे मुलांसाठी 1 व मुलींसाठी
1, कळमनुरी येथे मुलांसाठी 1 व मुलींसाठी 1, तर सेनगाव येथे मुलांसाठी 1 वसतिगृह आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात मुलांसाठी
4 आणि मुलींसाठी 4 अशी एकूण 8 वसतिगृहे उपलब्ध आहेत.
अनुसूचित जाती व नवबौद्ध
घटकातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांना
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ ऑनलाइन पद्धतीने दिला जाणार आहे.
मात्र, स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केलेला असणे
अनिवार्य आहे.
वसतिगृहासाठी पात्र
असूनही ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा
लाभ घेता येणार आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित
राहू नये, यासाठी प्रथम वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील जास्तीत
जास्त पात्र अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पूर्वी वसतिगृह प्रवेशासाठी
ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment