21 August, 2026

हिंगोलीत २५ ऑगस्टपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


हिंगोली, दि. २१ (जिमाका) : श्रावण मास तसेच आगामी धार्मिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात २५ ऑगस्ट रोजी ००:०१ वाजेपासून ८ सप्टेंबर रोजी २३:५९ वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी सदरील आदेश निर्गमित केले आहेत. नागरिकांनी आदेशाचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच शस्त्रे, काठ्या, दगड, स्फोटक व ज्वलनशील पदार्थ तसेच इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना दुखावतील, सार्वजनिक शांतता भंग होईल अथवा अराजक निर्माण होईल, अशा घोषणा, फलक, अंगविक्षेप किंवा कृती करण्यासही मनाई आहे.

जिल्ह्यात ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रावण सोमवार, श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला आदी धार्मिक सण-उत्सव होणार आहेत. तसेच विविध सामाजिक व राजकीय मागण्यांसाठी मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्तारोको व उपोषण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सदरील आदेश लागू करण्यात आले आहेत.

शासकीय कर्तव्य बजावणारे अधिकारी-कर्मचारी, विवाह समारंभ, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा तसेच सक्षम प्राधिकाऱ्याची विशेष परवानगी असलेल्या मिरवणुका व कार्यक्रमांना आदेश लागू राहणार नाहीत. विशेष परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहतील, असेही आदेशात नमूद आहे.

No comments: