18 August, 2026

येलदरी ते शिवार: समृद्ध हिंगोलीचा नवा निर्धार!



पूर्णा, कयाधू नदीच्या तीरावर वसलेल्या हिंगोली जिल्ह्याची माती अत्यंत कसदार आहे. या मातीला जेव्हा पाण्याची जोड मिळते, तेव्हा शिवार सोन्यासारखे पिकते. मराठवाड्याच्या सिंचन इतिहासात येलदरी धरणाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्णा नदीवर उभारलेला हा बहुउद्देशीय प्रकल्प केवळ दगड-मातीची भिंत नाही, तर हिंगोलीच्या कृषी आणि आर्थिक विकासाची खरी जीवनरेखा आहे. या प्रकल्पामुळे आपल्या भागात बागायती शेतीची पायाभरणी झाली.

मात्र, बदलत्या हवामानाच्या काळात केवळ एका मोठ्या धरणावर संपूर्ण जिल्ह्याचे भवितव्य अवलंबून ठेवता येत नाही. पावसाचा वाढता लहरीपणा आणि भूगर्भातील पाण्याची घटती पातळी हे आजचे भीषण वास्तव आहे. आजही हिंगोलीतील अनेक गावे सिंचनाच्या पाण्यापासून वंचित आहेत. उन्हाळा सुरू झाला की शेतातील विहिरी तळ गाठतात आणि पाणीटंचाईच्या झळा तीव्र होतात. हे चित्र बदलायचे असेल, तर आपल्याला मोठ्या धरणांच्या सोबतीला विकेंद्रित जलसंधारणाची भक्कम जोड द्यावी लागेल.

 पाणी अडवा, पाणी जिरवा: एक शाश्वत विचार 

शेतीसाठी सिंचनाचे पाणी किती मोलाचे असते, हे कोरडवाहू शेतकरी चांगल्या प्रकारे जाणतो. पाणी असेल तरच शेतात बारमाही पिके घेता येतात. पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य सामावलेले असते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी दिलेला "पाणी अडवा, पाणी जिरवा" हा विचार याच भूमिकेतून पुढे आला. त्यांनी जलसंधारणाला राज्यव्यापी चळवळीचे स्वरूप दिले.

त्यांच्या याच अमूल्य कार्याचा सन्मान करण्यासाठी शासनाने २१ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राज्यभरात 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून निसर्गाचे देणे फेडण्याचा एक संकल्प आहे. मोठ्या धरणांवरील ताण कमी करून गावपातळीवर पाणी अडवणे आणि भूगर्भातील पाणीसाठा वाढवणे, हा यामागचा मूळ हेतू आहे.

 शासकीय योजनेचे लोकचळवळीत रूपांतर 

जलसंधारण ही केवळ योजना नाही. जोपर्यंत ही गावागावांतील लोकांची चळवळ बनत नाही, तोपर्यंत शाश्वत बदल घडणे कठीण आहे. १५ ते २१ ऑगस्ट दरम्यानचा 'जलसंधारण सप्ताह' आणि पुढे २६ जानेवारीपर्यंत चालणारे विशेष अभियान हा याच लोकसहभागाचा मार्ग आहे.

पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी राज्यभरात 'महा वॉकेथॉन'सारखे उपक्रम राबवले जात आहेत. 'माती वाचवा, पाणी वाचवा आणि उद्याचे भविष्य सुरक्षित करा' हा संदेश घेऊन आजची तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून तरुण पिढीला या चळवळीत सामावून घेतले जात आहे. जेव्हा गावातील प्रत्येक नागरिक आणि शेतकरी स्वतःला 'जलदूत' मानून पुढे येईल, तेव्हा पाण्याचे संवर्धन सहज साध्य होईल.

 हिंगोलीच्या समृद्धीची गुरुकिल्ली: जलसिंचन 

हिंगोली हा प्रामुख्याने हळद आणि केळी उत्पादनात अग्रेसर असणारा जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्यातील हळदीला जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख आहे. या 'पिवळ्या सोन्याची' शेती अधिक फुलवण्यासाठी मुबलक आणि वेळेवर मिळणारे पाणी हाच कळीचा घटक आहे. ज्या भागात पाण्याची शाश्वत सोय झाली, तेथील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले आहे.

जिल्ह्यातील उर्वरित कोरडवाहू पट्टा सिंचनाखाली आणणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी नदी-नाल्यांचे खोलीकरण, पाझर तलावांची दुरुस्ती, शेततळ्यांची निर्मिती आणि मातीचे सलग समपातळी बांध घालणे या कामांना गती दिली जात आहे.  जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शिवारातील पाणी शिवारातच अडवले गेले, तर कोरडवाहू शेतकरी देखील निश्चितपणे बागायती शेतीकडे वळेल.

 जलसमृद्धीचा नवा निर्धार 

पाणी हे केवळ निसर्गाचे साधन नाही, तर ते ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मूळ कणा आहे. पाणी अडवले तर मातीची धूप थांबते. माती वाचली तर जमिनीची सुपीकता टिकून राहते. जमिनीत ओलावा टिकून राहिला, तरच लहरी हवामानातही पिके तग धरू शकतात.

येलदरीच्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगतानाच, आता प्रत्येक गावात आणि प्रत्येक शेतात पाण्याचा थेंब अन् थेंब जिरवण्याचा ध्यास आपल्याला घ्यावा लागेल. हिंगोली जिल्ह्याला दुष्काळमुक्त, सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी प्रत्येकाने या जलसंधारणाच्या कार्यात आपले योगदान दिले पाहिजे. पाणी जपणे हीच आपल्या पुढच्या पिढीसाठी सर्वात मोठी शाश्वत संपत्ती ठरणार आहे.

- डॉ. श्याम टरके 

प्र. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली

No comments: