10 August, 2026

अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांसाठी ‘माझी मराठी माझी भाषा’ प्रशिक्षणाचे आयोजन

 


·         हिंगोलीत 15 ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांसाठी ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी भाषा, मराठी माझी संवाद भाषा’ या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक तसेच चालकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठी भाषा ही उपयोजनाची भाषा म्हणून रुजविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान व्हावे, यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 14 ऑगस्टपर्यंत दररोज दुपारी 3 वाजता प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवाना धारकांना व्यवहारिक मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी मोबाईल ॲप विकसित केले असून, त्याद्वारे ऑनलाइन व्यवहारिक मराठी भाषा सरावाची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक तसेच चालकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन मराठी भाषेचा वापर वाढवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक तसेच चालकांनी दि. 15 ऑगस्ट 2026 पर्यंत प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. दि. 16 ऑगस्ट 2026 पासून परिवहन विभागामार्फत तपासणीदरम्यान अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक अथवा चालकांनी प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

जिल्ह्यातील संबंधित अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक तसेच चालकांनी विहित मुदतीत प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संतोष मरूळ जाधव यांनी केले आहे.

*******

 

No comments: