·
आधारसंलग्न बँक खात्यात
थेट मिळणार योजनेचा लाभ
हिंगोली (जिमाका),
दि. 10 : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असूनही प्रवेश न मिळालेल्या अथवा वसतिगृहात
प्रवेश न घेतलेल्या आणि निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेण्यात अडचणी
येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत इयत्ता
11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध
महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शासकीय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा
स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात
थेट जमा करण्यात येते.
सन 2025-26 या शैक्षणिक
वर्षात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाइन अर्ज
नूतनीकरणाची सुविधा 15 सप्टेंबर 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी समाज
कल्याण विभागाच्या स्वाधार योजना ऑनलाइन पोर्टलवर जाऊन नूतनीकरण अर्ज सादर करावा. अर्ज
सादर करताना मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करणे तसेच चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाची
माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी
मागील वर्षी स्वाधार योजनेचा नूतनीकरण अर्ज सादर करून योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना
विद्यमान पोर्टलवर ऑनलाइन नूतनीकरण अर्ज सादर करता येणार आहे. तसेच मागील वर्षी प्रथम
वर्षासाठी नवीन अर्ज सादर करून स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही विहित
मुदतीत नूतनीकरण अर्ज सादर करता येणार आहे.
स्वाधार योजनेचे अर्ज
विहित मुदतीत प्राप्त होऊन त्यांची तपासणी करणे आणि पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा
लाभ वेळेत अदा करणे आवश्यक आहे. त्यामुळे सन 2025-26 मध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या
सर्व विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत नूतनीकरण अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर
करावेत.
विहित मुदतीत नूतनीकरण
अर्ज सादर न केल्यास संबंधित विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची
शक्यता आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीची प्रतीक्षा न करता आवश्यक कागदपत्रांसह
नूतनीकरण अर्ज ऑनलाइन सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी
केले आहे.
*****
No comments:
Post a Comment