हिंगोली (जिमाका), दि. 13 : हिंगोली जिल्ह्यात नात्याअंतर्गत दाखल झालेल्या पहिल्या दत्तक प्रकरणास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मान्यतेने दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी अंतिम मंजुरी देण्यात आली. कायदेशीर प्रक्रियेद्वारे बालक दत्तक घेण्यास इच्छुक पालकांना त्यांच्या हक्काचे बालक मिळाल्याने त्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत ही संपूर्ण दत्तक प्रक्रिया पार पाडण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी दत्तक घेणारे पालक, दत्तक देणारे पालक तसेच साक्षीदार यांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रकरणाची प्रक्रिया पूर्ण केली.
यानंतर संबंधित प्रकरण बाल कल्याण समिती, हिंगोलीचे अध्यक्ष सुधाकरराव इंगोले व सदस्यांसमोर सादर करण्यात आले. समितीची मान्यता प्राप्त झाल्यानंतर दत्तक नियमावली-2022 नुसार सदर प्रकरणासाठी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणकडून पूर्व मंजुरी पत्र प्राप्त झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर दत्तक प्रकरणास अंतिम मंजुरी देत आदेश पारित केला.
ही संपूर्ण दत्तक प्रक्रिया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
नात्याअंतर्गत दत्तक प्रक्रियेसाठी नोंदणी आवश्यक
नात्याअंतर्गत बालक दत्तक घेण्यास इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार www.missionvatsalya.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. दत्तक प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
**
No comments:
Post a Comment