20 August, 2026

*हिंगोलीत उद्योजकता मेळाव्यात ७८ नवउद्योजकांचा सहभाग*

 

हिंगोली, दि. २० (जिमाका) : युवक-युवतींना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित उद्योजकता मेळाव्यात जिल्ह्यातील ७८ नवउद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मेळाव्यात विविध शासकीय योजना, आर्थिक सहाय्य, व्यवसायवृद्धी आणि उद्योग विस्ताराच्या संधींबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली आणि ‘दे-आसरा फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), हिंगोली येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन केले.

अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना आयटीआयचे प्राचार्य रवी बोथीकर यांनी युवक आणि महिला बचत गटांनी अपयशाची भीती न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे सांगितले. कौशल्य, सातत्य आणि योग्य नियोजनातून यशस्वी उद्योजक होता येते, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त अनिल कदम आणि जिल्हा उद्योग अधिकारी श्री.पतकी यांनी उद्योग उभारणीसाठी उपलब्ध शासकीय योजना, सुविधा आणि प्रोत्साहनपर योजनांची माहिती दिली. कर सल्लागार सुनील झवर यांनी करप्रणाली व आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

सावंत डेअरी अँड ॲग्रो इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक भगवान सावंत यांनी उद्योग उभारणी व विस्तारातील प्रत्यक्ष अनुभव सांगितला. ‘दे-आसरा फाउंडेशन’च्या रुपाली श्रीमाळ आणि ऐश्वर्या कुलकर्णी यांनी व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि व्यवसाय नीती याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन, उपलब्ध आर्थिक सहाय्य, व्यवसायवृद्धीच्या संधी आणि उद्योग विस्ताराच्या विविध बाबींची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ टोणपे यांनी केले.

No comments: