• सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल
हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्ह्यात विविध सामाजिक व विकासात्मक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांचा तसेच संस्थेचा जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी गौरव करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोलीमार्फत सन 2023-24 ते 2025-26 या कालावधीतील जिल्हास्तर युवा पुरस्कारार्थींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
सन 2023-24 चा युवा पुरस्कार हिंगोली येथील पुष्यमित्र केशव जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी हिंगोली जिल्ह्यात राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, शिक्षण, आरोग्य, युवकांचा सर्वांगीण विकास तसेच नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
सन 2024-25 चा युवा पुरस्कार औंढा नागनाथ तालुक्यातील तपोवन येथील बजरंग लिबाजी कदम यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी अनुसूचित जमाती, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, युवकांचा सर्वांगीण विकास, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन तसेच नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
सन 2025-26 चा युवा पुरस्कार औंढा नागनाथ तालुक्यातील वडचुना येथील गजानन अशोक आडे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी पर्यावरण, क्रीडा, महिला सक्षमीकरण, युवकांचा सर्वांगीण विकास तसेच नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
यासोबतच सन 2025-26 च्या संस्थास्तरीय युवा पुरस्कारासाठी कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तु. येथील रेणुकाई बहुउद्देशीय सांस्कृतिक सेवाभावी संस्था यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेने आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, क्रीडा, महिला सक्षमीकरण तसेच इतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
निवड झालेल्या प्रत्येक युवा पुरस्कारार्थीस 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर संस्थेला 50 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील युवक व संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी झालेली ही निवड युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देणारी ठरणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
***
No comments:
Post a Comment