हिंगोली, दि. २७ ऑगस्ट : सन 1871 मध्ये ब्रिटिश सरकारने Criminal Tribes Act अंतर्गत काही जातींना ‘गुन्हेगार जाती’ म्हणून घोषित केले. या अन्यायकारक कायद्यामुळे या समाजातील बांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार व सामाजिक अन्याय सहन करावा लागला. स्वातंत्र्यानंतरही भटके विमुक्त समाज दीर्घकाळ मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने त्यांना सामाजिक न्याय व विकासाच्या संधी मिळण्यास विलंब झाला. परिणामी, या समाजावर दीर्घकालीन सामाजिक परिणाम झाले.
स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी Criminal Tribes Act रद्द करण्यात आला आणि या समाजातील जातींना ‘भटके विमुक्त जाती’ म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीमध्ये भटके विमुक्त समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्वातंत्र्य चळवळ तसेच राष्ट्र उभारणीतील या समाजाचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन सभागृह येथे भटके विमुक्त दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास संबंधित अधिकारी, कर्मचारी, भटके विमुक्त समाजाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment