हिंगोली (जिमाका), दि. 13 : हिंगोली जिल्ह्यातील सूक्ष्म व अतिसूक्ष्म उद्योजकांना व्यवसाय विकासासाठी मार्गदर्शन मिळावे, त्यांचे ज्ञानवर्धन व्हावे तसेच उद्योजकांमध्ये परस्पर संवाद व नेटवर्किंग वाढावे, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उद्योजक मेळावा व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा दि. 19 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी परिसर, लिंबाळा मक्ता, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे. उद्योजकांनी सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यात लाखो सूक्ष्म व अतिसूक्ष्म उद्योजक विविध क्षेत्रांत व्यवसाय करीत असून, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, व्यवसायवृद्धीसाठी प्रभावी रणनीती, डेअरी व ॲग्रो इंडस्ट्रीज, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, शासकीय योजनांचा लाभ, वित्तीय व्यवस्थापन, उत्पादनाचा दर्जा तसेच ग्राहकांशी प्रभावी संवाद आदी बाबींमध्ये उद्योजकांना अनेकदा विविध अडचणींचा सामना करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर उद्योजकांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या अडचणींचे निराकरण व्हावे तसेच विविध क्षेत्रांतील उद्योजकांमध्ये परस्पर ओळख व व्यावसायिक नेटवर्किंग निर्माण व्हावे, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त एस. एस. कदम (उद्योग व सेवा) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सीए सुनील झंवर, भगवान सावंत (सावंत डेअरी) आणि दे आसरा फाउंडेशनचे प्रतिनिधी विविध विषयांवर उद्योजकांना सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील सूक्ष्म व अतिसूक्ष्म उद्योजकांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी https://forms.gle/Y5CegHnMSK3sPzek8 या लिंकवर नोंदणी करावी. तसेच दि. 19 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे.
या मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी 7385924589 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.
***
No comments:
Post a Comment