
हिंगोली (जिमाका),
दि. 13 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज औंढा नागनाथ तालुक्याला भेट देऊन विविध
शासकीय कार्यालये, विकासकामे व सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालय,
तालुका क्रीडा संकुल, महावितरणचे वीज उपकेंद्र, तहसील कार्यालय तसेच चिमेगाव ते पेरजाबाद
रस्त्याची पाहणी करून संबंधित विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी राहुल
गुप्ता यांनी सर्वप्रथम औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयातील
उपलब्ध आरोग्य सुविधा, औषधसाठा, वैद्यकीय सेवा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच
मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ग्रामीण
भागातील नागरिकांना शासनाच्या आरोग्य सेवा प्रभावीपणे व वेळेत उपलब्ध करून देण्याच्या
दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यानंतर जिल्हाधिकारी
श्री. गुप्ता यांनी औंढा नागनाथ शहरातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या
कामकाजाचा आढावा घेतला. मतदार यादी पुनरीक्षणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाची
प्रगती, मतदारांच्या नोंदींची पडताळणी तसेच आवश्यक कार्यवाहीबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून
माहिती घेतली. पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट राहतील आणि कोणताही पात्र
मतदार वंचित राहणार नाही, यासाठी काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तालुका क्रीडा संकुलालाही
त्यांनी भेट देऊन पाहणी केली. क्रीडा संकुलातील उपलब्ध सुविधा, मैदानाची स्थिती, खेळाडूंसाठी
आवश्यक सोयी-सुविधा आणि संकुलाच्या वापराबाबत त्यांनी माहिती घेतली. स्थानिक पातळीवरील
खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक बाबींचा त्यांनी आढावा घेतला.
त्यानंतर महावितरणच्या
वीज उपकेंद्राची पाहणी करून वीजपुरवठ्याची स्थिती आणि उपकेंद्राच्या कामकाजाची माहिती
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतली. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या
उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
तहसील कार्यालयात सुरू असलेल्या हॉलच्या कामाचीही
त्यांनी पाहणी केली. सदर कामाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा आणि काम पूर्ण करण्याच्या
दृष्टीने आवश्यक बाबींची माहिती त्यांनी घेतली. यावेळी तहसील कार्यालयात सुरू असलेल्या
एसआयआर कार्यक्रमाच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.
तसेच जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांनी चिमेगाव ते पेरजाबाद रस्त्याची पाहणी करून रस्त्याची सद्यस्थिती
आणि वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक बाबींची माहिती घेतली. नागरिकांच्या दळणवळणासाठी महत्त्वाच्या
असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीच्या
सूचना त्यांनी दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी
उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, तहसीलदार हरीश गाडे, जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. नितीन तडस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या
या पाहणीमुळे औंढा नागनाथ तालुक्यातील विविध शासकीय सेवा, विकासकामे आणि प्रशासकीय
उपक्रमांच्या प्रगतीला गती मिळण्यास मदत होणार आहे.
******
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)


No comments:
Post a Comment