जास्तीत जास्त पक्षकारांनी उपस्थित राहून लोकअदालतीचा लाभ घ्यावा
हिंगोली (जिमाका), दि. 14 : हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार, दि. 22 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती व वकील संघ, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे.
हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील तालुक्यातील विविध न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोडयोग्य फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक व कौटुंबिक वादाची प्रकरणे, पराक्रम अभिलेख अधिनियमाचे कलम 138 अंतर्गत प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकारांना आपापसातील तडजोडीद्वारे प्रकरणे निकाली काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर तसेच वकील संघाचे अध्यक्ष अॅड. श्रीधर घुगे यांनी केले आहे.
न्यायालयीन प्रकरणे सामोपचाराने व तडजोडीने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालत प्रभावी माध्यम असून, संबंधित पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment