15 August, 2026

80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम, हिंगोलीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देणार– पालकमंत्री नरहरी झिरवाळ

 






पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला मुख्य ध्वजारोहण समारंभ

महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन

जलसंधारण सप्ताहानिमित्त लोगोचे अनावरण 

शेतकरी कर्जमुक्ती हाच राज्य शासनाचा मुख्य अजेंडा

शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घेण्याचे आवाहन

जिल्हावासीयांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य; भूकंपरोधक इमारती रेट्रोफिटींगची प्रकिया सुरु


हिंगोली(जिमाका),दि. 15 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या साडेसात हजारांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 62 कोटी 54 लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे हिंगोलीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज 80 वा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी श्री. झिरवाळ बोलत होते.

यावेळी आमदार खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर आणि राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह सर्व जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुख उपस्थित होते. 

पुढे बोलताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सक्षमीकरणासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे बँकांना आवाहन केले. जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचे 43 हजार 541 लाभार्थी शेतकरी असून, 31 हजार 372 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करून घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मागील वर्षी थेट हस्तांतरणाद्वारे 491 कोटी रुपये वितरित केले असून, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेंतर्गत जिल्ह्यातील 80 हजार कृषीपंप ग्राहकांचे 572 कोटी रुपयांचे वीज बिल माफ करण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

देशात भारत निवडणूक आयोगाचे विशेष मतदार यादी पुनरीक्षण अभियान सुरु आहे. मतदार नोंदणी अर्जांच्या संगणकीकरणात हिंगोलीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील 8 लाख 83 हजार 645 मतदारांचे गणनापत्र डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. नागरिकांनी 17 ऑगस्टपर्यंत गणनाप्रपत्र भरून देत या अभियानात आपले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा वितरणात हिंगोलीने राज्यात दुसरा व विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच फेब्रुवारी 2026 मध्ये सीसीटीएनएस कामगिरीत हिंगोली जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले.

येत्या 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त जलसंधारण सप्ताह आणि ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले असून, जिल्हावासीयांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री झिरवाळ यांनी केले.

जिल्ह्यात सतत होत असलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भूकंपरोधक बांधकामासाठी इमारत सुरक्षा कार्यशाळा घेण्यात आली असून, नागरिकांच्या जीवित रक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान, तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिक्षणासाठी ‘इंग्रजी काळ समृद्धी’ व पुस्तकपेटी उपक्रम राबविण्यात येत असून, भाषाज्ञान वृद्धीसाठी चौदाखडीचा स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. 

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये मतदार यादी सूक्ष्म निरीक्षणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल उपजिल्हा निवडणूक अधिकारी, विविध स्पर्धा परिक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक, विविध सामाजिक व विकासात्मक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांचा तसेच संस्थेचा जिल्हास्तरीय युवा पुरस्काराने गौरव करण्यात आला. पोलीस विभागातील अति उत्कृष्ट, उत्कृष्ट सेवा पदक पुरस्कार प्राप्त अधिकारी, कर्मचारी यांचा तसेच मिशन ऊर्जामध्ये महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, वाहतूक सुरक्षा या विषयाची जनजागृती करणारे अधिकारी-कर्मचारी, हिंगोली पोलीस दलास डायल 112 कामकाजामध्ये महाराष्ट्र पहिला क्रमांक मिळाल्याबद्दल तसेच सीसीटीएनसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच मिशन ऊर्जा कार्यक्रमात जनजागृती करणाऱ्या शाळा-महाविद्यालयाचा तसेच एनक्यूएस मानांकनात पुरस्कार प्राप्त आरोग्य संस्थांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. 

यावेळी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत तंबाखू मुक्ती व मृद व जलसंधारण सप्ताहाची शपथ देण्यात आली. जलसंधारण सप्ताहाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले.

या कार्यक्रमास विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*****

No comments: