10 August, 2026

‘बालविवाह मुक्त हिंगोली’साठी चॅम्पियन्स प्रशिक्षण संपन्न * जिल्ह्यातील 120 अधिकारी-कर्मचाऱ्यांना बालविवाह निर्मूलनासाठी प्रशिक्षण

 

 

हिंगोली(जिमाका), दि. 10 : जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण कमी करून हिंगोली जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 नुसार हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण 37.1 टक्के असून, बालविवाहाच्या प्रमाणाच्या बाबतीत जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर बालविवाह निर्मूलनासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

बालविवाह निर्मूलनासाठी प्रभावी नियोजन, अंमलबजावणी व आवश्यक निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सन 2021 मध्ये जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाच्या माध्यमातून बालविवाहमुक्त जिल्ह्याच्या दिशेने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभाग, युनिसेफ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. हे एकदिवसीय प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणामध्ये आरोग्य, पंचायत, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच महिला व बालविकास विभागातील तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय अधिकारी-कर्मचारी आणि बालविवाहाच्या दृष्टीने संवेदनशील (हॉटस्पॉट) गावांमधील 50 ग्रामपंचायत अधिकारी अशा एकूण 120 अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, युनिसेफच्या बालसंरक्षण सल्लागार डॉ. सरिता शंकरन, प्रमुख प्रशिक्षक सुमित्रा आष्टीकर, सल्लागार नंदू जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या प्रशिक्षणामध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006, बालविवाहाच्या प्रकरणांमध्ये तातडीने प्रतिसाद देणे व प्रभावी पाठपुरावा करणे, विभागनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या ईसीएम चॅम्पियन्सची भूमिका व जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

बालविवाह निर्मूलनासाठी कार्यान्वय योजना तयार करून त्यानुसार नियोजन करणे, साप्ताहिक देखरेख अहवाल तयार करणे, त्यांचा नियमित आढावा घेऊन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे, बालविवाह निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती नियमितपणे गुगल लिंकद्वारे सादर करणे, जिल्हा कृती आराखड्यासाठी विविध विभागांचे सहकार्य व समन्वय साधणे तसेच केलेल्या कार्याचा अहवाल जिल्हा कृती दलाच्या बैठकीत सादर करण्यासाठी आवश्यक अहवाल तयार करणे, याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता तसेच बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाचे सदस्य सचिव व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख प्रशिक्षक सुमित्रा आष्टीकर, डॉ. सरिता शंकरन आणि नंदू जाधव यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा महिला व बालविकास विभाग तसेच जिल्हा बालसंरक्षण व चाइल्ड हेल्पलाईन कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करून बालविवाह रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले.

****** 



No comments: