▶शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोफत सुविधा
▶ गरजू नागरिकांनी लाभ घेण्याचे अधिष्ठाता डॉ. मुंगल यांचे आवाहन
हिंगोली, दि. २७ (जिमाका) : सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. बाह्यरुग्ण नोंदणी (ओपीडी) कक्षाच्या शेजारी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल यांनी सांगितले.
या कक्षामुळे गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना एकाच ठिकाणी आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील गरजू नागरिक व रुग्णांनी या कक्षाला भेट देऊन आयुष्मान कार्ड काढून घ्यावे. कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे, असेही डॉ. मुंगल म्हणाले.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळतो. हृदयविकार, कर्करोग व अस्थिरोग यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रियांचाही यात समावेश आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लागणारी औषधे, निदानात्मक तपासण्या व निवासाचा खर्चही योजनेअंतर्गत समाविष्ट आहे. हे कार्ड देशभरातील नोंदणीकृत शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी ग्राह्य धरले जाते. आयुष्मान कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
*कार्ड काढताना येणाऱ्या अडचणींसाठी उपाय*
नवविवाहित महिलेचे नाव सासरच्या रेशन कार्डमध्ये नसल्यास तहसील कार्यालयात आवश्यक कार्यवाही करून नाव समाविष्ट करून घ्यावे. आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसल्यास किंवा क्रमांक बंद असल्यास आयुष्मान कक्षात बायोमेट्रिक अथवा फेस ऑथेन्टिकेशनद्वारे पडताळणी करून कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.
आधार कार्ड व रेशन कार्डवरील नावात फरक असल्यास रेशन कार्डाचे ई-केवायसी अद्ययावत असणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार मतदार ओळखपत्रासारखा इतर ओळखीचा पुरावाही सादर करता येईल. रेशन कार्डमध्ये नाव नसल्यास प्रथम तहसील कार्यालयामार्फत नाव नोंदवून घ्यावे.
सर्व्हर किंवा तांत्रिक अडचणीमुळे कार्ड काढण्यास विलंब झाल्यास संबंधित नागरिकांना टोकन देण्यात येईल. त्यानंतर निश्चित वेळेत कार्ड तयार करून देण्यात येईल, असेही डॉ. मुंगल म्हणाले.
No comments:
Post a Comment