31 August, 2026

हिंगोली जिल्ह्यात नात्याअंतर्गत व सावत्र दत्तक प्रक्रियेतील 4 प्रकरणांना मान्यता*

हिंगोली, दि. 31 (जिमाका) : जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मान्यतेने नात्याअंतर्गत व सावत्र दत्तक प्रक्रियेतील चार प्रकरणांना आज, दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी अंतिम आदेश देण्यात आला. कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत बालक दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना त्यांच्या हक्काचे बालक मिळाल्याने त्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला.


जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत ही संपूर्ण दत्तक प्रक्रिया पार पाडण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी दत्तक घेणारे व दत्तक देणारे पालक तसेच साक्षीदार यांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण केली.


संबंधित प्रकरणे बाल कल्याण समिती, हिंगोलीचे अध्यक्ष सुधाकरराव इंगोले व सदस्यांसमोर सादर करण्यात आली. समितीची मान्यता मिळाल्यानंतर दत्तक नियमावली-2022 नुसार संबंधित प्रकरणांसाठी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाकडून (CARA) पूर्वमंजुरी पत्र प्राप्त झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या दालनात सुनावणी घेऊन दत्तक प्रक्रियेबाबत अंतिम आदेश पारित करण्यात आले.


ही संपूर्ण दत्तक प्रक्रिया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


नात्याअंतर्गत दत्तक घेण्यास इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रियेसाठी www.missionvatsalya.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा.

00000

No comments: