15 August, 2026

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

 

* वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचा आढावा

* १०८ रुग्णवाहिका सेवेत वाढ करण्याचे निर्देश







हिंगोली (जिमाका), दि. 15 : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर विशेष भर देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, आमदार संतोष बांगर, आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच इतर आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा प्रभावी वापर, आवश्यक भौतिक सुविधांचे बळकटीकरण आणि विविध आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील आरोग्याच्या भौतिक सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी नमूद केले. आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून नागरिकांना गुणात्मक दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कॅन्सर रुग्णांच्या तपासणी व उपचारानंतरच्या देखरेखीवर भर

जिल्ह्यात कॅन्सरच्या संशयित रुग्णांची तपासणी प्रभावीपणे करण्यात यावी. कॅन्सरग्रस्त महिलांच्या उपचारानंतरच्या पाठपुराव्यासाठी (फॉलोअप) योग्य सनियंत्रण व्यवस्था निर्माण करावी. आशा कार्यकर्त्यांमार्फत कॅन्सरग्रस्त महिलांच्या नियमित भेटी घेऊन त्यांच्या आरोग्यस्थितीची माहिती घेण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले.

या बैठकीत हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची गुणवत्ता व प्रगती यांचाही आढावा घेण्यात आला. बांधकामाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देऊन कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले.

ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत संदर्भ सेवा उपलब्ध होण्यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवेची क्षमता वाढविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यासाठी नव्याने आणखी ६ रुग्णवाहिकांची मागणी करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, असे पालकमंत्र्यांनी सूचित केले.

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या जिंगलचे अनावरण

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या जिंगल टोनचे अनावरण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

*******

No comments: