• परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 14 : परभणी डाक विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीनदयाळ स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्ती योजना स्पर्धा परीक्षा 2026-27 आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत परभणी डाक विभागांतर्गत येणाऱ्या परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांतील जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन डाक अधीक्षक संजय अंबेकर यांनी केले आहे.
ही स्पर्धा इयत्ता 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी असून, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे पोस्टात फिलाटेली डिपॉझिट अकाउंट असणे आवश्यक आहे. हे खाते केवळ 200 रुपये भरून उघडता येते. यापूर्वीच फिलाटेली डिपॉझिट अकाउंट उघडलेले असल्यास नवीन खाते उघडण्याची आवश्यकता नाही. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत शुक्रवार, दि. 18 सप्टेंबर 2026 आहे.
ही स्पर्धा दोन टप्प्यांत घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस डाक विभागातर्फे 50 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेचे मूल्यमापन राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. त्यानुसार इयत्ता 6 वी ते 9 वीच्या प्रत्येक इयत्तेच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना फिलाटेली प्रोजेक्ट तयार करण्यासाठी कळविण्यात येईल.
दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फिलाटेली प्रोजेक्टच्या आधारे राज्यस्तरावर अंतिम निवड करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला 6 हजार रुपये शिष्यवृत्ती तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
गेल्या तीन वर्षांत परभणी जिल्ह्यातील एकूण 17 विद्यार्थ्यांनी या योजनेअंतर्गत 1 लाख 2 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळविली आहे. यावर्षीही परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांतील सर्व शाळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन डाक अधीक्षक संजय अंबेकर यांनी केले आहे.
या स्पर्धेची अधिक माहिती मिळविण्यासाठी विपणन अधिकारी सचिन कदम तसेच परभणी डाक विभागाचे कार्यालयीन सहायक श्रीपाद कुंभारकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन परभणी डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.
***
No comments:
Post a Comment