हिंगोली (जिमाका), दि. २५ ऑगस्ट : आगामी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर मेरा युवा भारत (MY Bharat), हिंगोली यांच्या वतीने ‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार 27 ऑगस्ट 2026 रोजी न्यू मॉडेल डिग्री कॉलेज आणि आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे करण्यात आले आहे.
मेरा युवा भारत, हिंगोली यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या कल्पना व सूचना मांडाव्यात आणि ‘विकसित भारत’ घडविण्याच्या राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मेरा युवा भारतचे अनिल ढेंगे यांनी केले आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू आणि राष्ट्रीय क्रीडा प्रतीक मेजर ध्यानचंदजी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. यानिमित्ताने देशभरात युवकांचा सहभाग, क्रीडा विकास आणि राष्ट्रनिर्मिती यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
‘युवा कनेक्ट’ उपक्रमाच्या माध्यमातून युवक, खेळाडू, युवा नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना एका व्यासपीठावर आणून भारतातील क्रीडा क्षेत्राचा विकास आणि युवकांच्या आकांक्षा याबाबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आभासी संवाद, 27 ऑगस्ट रोजी देशभरातील 1 हजार 600 ठिकाणांहून 8 लाखांहून अधिक युवक या कार्यक्रमाशी जोडले जाणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील युवकांनाही या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवक, MY Bharat स्वयंसेवक आणि स्थानिक खेळाडू यांच्यात विशेष संवाद आयोजित करण्यात येणार आहे. या संवादामध्ये भारतातील क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये झालेला बदल, क्रीडा क्षेत्रातील उपलब्ध संधी, ग्रामीण व तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि विकसित होत असलेली क्रीडा परिसंस्था याबाबत चर्चा केली जाणार आहे.
कार्यक्रमात ‘युवा संवाद’आयोजित करून युवकांना भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात आपल्या कल्पना, सूचना आणि आकांक्षा मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.
या चर्चेत पुढील प्रमुख विषयांवर विचारमंथन करण्यात येईल :
क्रीडा परिसंस्थेचे बळकटीकरण – दर्जेदार क्रीडा सुविधा, प्रशिक्षक, प्रशिक्षण व्यवस्था आणि तळागाळातील क्रीडा संधी उपलब्ध करून देणे.
2036 ऑलिम्पिकसाठी क्रीडा प्रतिभेचे संवर्धन – वैज्ञानिक पद्धतीने क्रीडा प्रतिभा शोधणे, खेळाडूंची निवड व विकास आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण.
युवा नेतृत्व व प्रशासनातील सहभाग – युवकांना निर्णयप्रक्रिया, सामाजिक उपक्रम आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी करून घेणे.
विकसित भारतासाठी युवा सक्षमीकरण – भविष्याभिमुख कौशल्ये, स्वयंसेवा, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिर्माणाच्या विविध संधींमध्ये युवकांचा सहभाग वाढविणे.
युवकांच्या सूचना व कल्पना क्युआर कोडच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार असून, उपस्थित युवकांना VBYLD Quiz मध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
*****
No comments:
Post a Comment