हिंगोली (जिमाका), दि. 15 : जलसंधारणाचे महत्त्व, पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने 21 ऑगस्ट 2026 रोजी ‘जलसंधारण दिना’निमित्त आयोजित ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या लोगोमध्ये ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ अर्थात मृदा संवर्धन, जलसंवर्धन आणि सुरक्षित भविष्याचा संदेश देण्यात आला आहे. जलसंधारणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याबरोबरच पाणी बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी लोकसहभाग वाढविण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.
यावेळी खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. ‘महा वॉकथॉन – वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून ‘पाणी वाचवा, माती वाचवा आणि भविष्यातील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश व्यापक स्वरूपात पोहोचविण्यात येणार आहे.
******

No comments:
Post a Comment