हिंगोली (जिमाका), दि. 7 : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य
संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय
प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ‘शिक्षक
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025’ मधील प्राप्त गुणांच्या आधारे इयत्ता 1 ली
ते 12 वीपर्यंतच्या रिक्त पदांची भरती करण्यात येत असून, पवित्र पोर्टलवर एकूण 30
हजार 209 रिक्त पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता
चाचणी-2025 ही दि. 27 मे 2025 ते 5 जून 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात
आली. या चाचणीसाठी एकूण 2 लाख 28 हजार 808 उमेदवारांनी
नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 11 हजार 308
उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले असून, 1
लाख 70 हजार 108 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केले आहे.
पवित्र पोर्टलवरील जाहिरातीमध्ये
जिल्हा परिषदांच्या 13 हजार 351, नगर
पालिका/परिषदांच्या 280, महानगरपालिकांच्या 1
हजार 954, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील 2
हजार 421, शासकीय विद्यानिकेतनमधील 56
आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील 12 हजार 148 रिक्त
पदांचा समावेश आहे. खासगी शैक्षणिक संस्थांमधील 1 हजार 819 पदे मुलाखतीशिवाय, तर 10
हजार 328 पदे मुलाखतीसह भरण्यात येणार आहेत.
इयत्तानिहाय रिक्त पदे
पदनिहाय जाहिरातीत इयत्ता 1 ली ते 5
वीसाठी 14 हजार 320, इयत्ता 6 वी ते 8
वीकरिता 10 हजार 12, इयत्ता 9 वी ते 10
वीकरिता 5 हजार 513, तर इयत्ता 11 वी ते 12
वीकरिता 364 पदे आहेत. अशा एकूण 30
हजार 209 पदांची जाहिरात करण्यात आली आहे.
11 ऑगस्टपर्यंत
पसंतीक्रम लॉक करणे आवश्यक
पदभरतीसाठी उमेदवारांना पवित्र
पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून,
उमेदवारांना एसएमएसद्वारेही माहिती देण्यात येत आहे. उमेदवारांनी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in
या संकेतस्थळावर लॉगिन करून प्राधान्यक्रम जनरेट करावा. त्यानंतर पदनिहाय
पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दि. 6 ऑगस्ट 2026
पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद
करून दि. 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 या
कालावधीत तो लॉक करणे आवश्यक आहे. उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण
झाल्यानंतर मुलाखतीशिवाय भरण्यात येणाऱ्या पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध
करण्यात येणार आहे.
पवित्र पोर्टलवरील पदभरतीसंदर्भात
उमेदवारांच्या काही सूचना, मागण्या अथवा म्हणणे असल्यास ते edupavitra25@gmail.com
या ई-मेलवर पाठवावे, जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेता येईल, असे आवाहन करण्यात
आले आहे.
******
No comments:
Post a Comment