07 August, 2026

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करा

 


जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांनी अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 7 : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात दि. 9 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करून नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या आहेत.

‘हर घर तिरंगा’ अभियान तसेच ‘वंदे मातरम्’ या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व विभाग, कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये आणि संबंधित यंत्रणांनी अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा.

 

विविध उपक्रमांचे आयोजन

‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ निमित्त राज्यस्तरीय कार्यक्रम व नाट्य आयोजन, प्रदर्शन, शॉर्ट फिल्म तसेच शाळा-महाविद्यालयीन स्तरावर परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शाळा व महाविद्यालयीन स्तरावर ‘MyGov’ पोर्टलवरील ‘प्रभातफेरी’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

‘वंदे मातरम्’ या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार कार्यक्रम, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत प्रदर्शन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

तिरंगा ई-बाईक रॅली व तिरंगा रॅली

 

अभियानांतर्गत तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली तसेच ‘सेल्फी विथ तिरंगा’ यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होऊन तिरंग्यासोबतचे सेल्फी https://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, महानगरपालिका, जिल्हा परिषद, शाळा-महाविद्यालये तसेच विविध संस्थांनी अभियानातील उपक्रमांचे नियोजन करून ते यशस्वीपणे राबवावेत. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासोबतच स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात जनसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

अभियानासंदर्भात अधिक माहितीसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या स्तरावर संपर्काची व्यवस्था करण्यात आली असून, स्वयंसेवक नोंदणी, सेल्फी अपलोड तसेच अभियानाशी संबंधित सविस्तर माहितीसाठी https://harghartiranga.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

 

*******

No comments: