हिंगोली, दि. १९ (जिमाका) : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांतील पात्र लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) ऑनलाइन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लाभार्थ्यांना BSA (Beneficiary Satyapan App) या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र सादर करता येईल. लाभार्थी स्वतःच्या मोबाईलद्वारे, नातेवाईकामार्फत किंवा गावपातळीवरील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायतीतील संगणक परिचालक अथवा कर्मचारी यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तसेच सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि नागरी सेवा केंद्रातूनही ही सुविधा उपलब्ध आहे.
ही सेवा लाभार्थ्यांसाठी निशुल्क आहे. मात्र, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवा घेतल्यास कमाल ५० रुपये सेवा शुल्क देय राहील. शासन निर्णय, दि. ७ मे २०२६ नुसार हयात प्रमाणपत्र सादर करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
*अशी करा प्रक्रिया*
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांनी किंवा वापरकर्त्यांनी प्रथम Google Play Store अथवा iOS वरून BSA (Beneficiary Satyapan App) आणि Aadhaar Face RD हे अॅप डाउनलोड करावे.
BSA अॅपमध्ये भाषा निवडून ‘Proceed For Device Registration’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. नोंदणीनंतर प्रत्यक्ष लाभार्थ्याचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवून Device Registration पूर्ण करावे.
त्यानंतर लाभार्थी ज्या योजनेचा लाभ घेत आहे, त्या केंद्र किंवा राज्य पुरस्कृत योजनेची निवड करून ‘Beneficiary Verification’ हा पर्याय निवडावा. आधार क्रमांक आणि उपलब्ध मोबाईल क्रमांक नोंदवून ‘Submit’ करावे.
यानंतर प्राप्त झालेला OTP नोंदवावा. त्यानंतर चेहरा ओळख (Face Capture) किंवा बोटांचे ठसे/डोळ्यांच्या बुबुळाची (Finger/Iris) पडताळणी यापैकी उपलब्ध पर्याय निवडावा. निवडलेल्या पर्यायानुसार पडताळणी पूर्ण केल्यानंतर हयात प्रमाणपत्र तयार होईल.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Digital Life Certificate डाउनलोड करावे. विशेष सहाय्य योजनांतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी ही कार्यवाही विहित पद्धतीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment