21 August, 2026

नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची गरज - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता  'महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर' अभियानाचा उत्साहात शुभारंभ  हिंगोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मृद व जलसंधारणाची घेतली शपथ






हिंगोली, दि. २१ (जिमाका):  महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून मृद व जलसंधारण करा, पाणी वाचवा, जलस्रोतांचे संरक्षण करा आणि पर्यावरणाचे संवर्धन करा हा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. मृद व जलसंधारण ही शाश्वत विकासाची महत्त्वाची बाब आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब नागरिकांनी जपून वापण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

हिंगोलीतील मृद व जलसंधारण विभागच्यावतीने मृद व जलसंधारण, जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हिंगोली शहरात महा-वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले होते.  आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी गुप्ता,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून महा-वॉकेथॉनला जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथून सुरूवात झाली.

उद्घाटनप्रसंगी आमदार श्री. बांगर यांनी पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश उपस्थितांना दिला.  जलसंधारण अभियानाअंतर्गत प्रत्येक विभाग प्रमुखांनी तर 15  ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 दरम्यान त्यांच्या शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे, असे सर्व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी याप्रसंगी आवाहन केले.

मृदसंधारण, जलसंधारण, पाण्याचा काटकसरीने वापर, जलस्रोतांचे संरक्षण तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. उपस्थित अधिकारी, कर्मचारी व सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली.  जिल्हा परिषद प्रशाला मैदान, नवीन न्यायालय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड नाका, इंदिरा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, निर्मल कॅफे, पाण्याची टाकी असा मार्गक्रमण करीत पुन्हा जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे महा-वॉकेथॉनचा समारोप झाला.

महा-वॉकेथॉनमध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे संवर्धन, मृदक्षय रोखणे, पावसाच्या पाण्याचे संधारण तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वॉकेथॉनप्रसंगी नागरिक, तरूणाईने जलजागृतीपर घोषणा दिल्या.

महा-वॉकेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. एम. शिंदे, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी विशाल चव्हाण, वसमतचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी विकास याचावाड, जलसंधारण अधिकारी अनंत घोलकर, विठ्ठल काळबांडे, उमेश अनमुलवाड, पंकज बारहाते, चैताली मेंते, श्रद्धा डाकोरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पवन माने, मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

No comments: