हिंगोली (जिमाका), दि. 28 : हिंगोली
जिल्ह्यात खरीप हंगाम 2026-27 सुरू होण्यापूर्वी कृषी विभागामार्फत खत उपलब्धतेचे नियोजन
पूर्ण करण्यात आले असून, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची खतटंचाई भासू नये यासाठी आवश्यक
उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड तसेच लातूर विभागाचे कृषी सहसंचालक
महेशकुमार तीर्थकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामासाठी हिंगोली जिल्ह्यास एकूण 98 हजार 300 मेट्रिक टन खताचे मंजूर आवंटन प्राप्त
झाले आहे. याशिवाय संरक्षित साठा म्हणून 1 हजार 950 मेट्रिक टन युरिया व 700 मेट्रिक
टन डीएपी खत उपलब्ध ठेवण्यास मंजुरी मिळाली आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना
वेळेवर व पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध व्हावे, यासाठी खत कंपन्या, घाऊक विक्रेते व किरकोळ
विक्रेत्यांशी समन्वय साधण्यात येत आहे. तसेच खत साठ्याचे नियमित निरीक्षण करून वितरण
व्यवस्थेवर देखरेख ठेवली जाणार आहे.
शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच
खत खरेदी करावे, पावती घ्यावी तसेच अनावश्यक साठेबाजी किंवा जादा दर आकारणीबाबत तक्रार
असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप
हंगामात आवश्यक खत पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी कृषी विभागाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली
सक्षम नियोजन केले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांनी
दिली आहे.
*******
No comments:
Post a Comment