हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्हाधिकारी
कार्यालय हिंगोली अंतर्गत कार्यरत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय
मदत कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात
येत असून नागरिकांना मोफत, दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य
सातत्याने सुरू आहे.
या कक्षामार्फत आयोजित करण्यात आलेल्या
समुदाय आरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत
एकूण 16 समुदाय आरोग्य शिबिरे यशस्वीरित्या पार पडली असून या शिबिरांमधून 6 हजार 291
लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा, तपासण्या व उपचारांचा लाभ मिळाला आहे.
विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांसाठी हे शिबिर मोठा दिलासा ठरले आहेत.
या शिबिरांमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली
विविध आजारांचे निदान, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, औषधोपचार तसेच आरोग्य जनजागृती करण्यात
आली. यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली असून वेळेवर उपचार
घेण्याची प्रवृत्तीही बळकट झाली आहे.
याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता
निधी कक्षामार्फत गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक
सहाय्य देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. चालू वर्षात या योजनेअंतर्गत एकूण 109 अर्ज
प्राप्त झाले असून त्यापैकी 68 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर लाभार्थ्यांना
एकूण रुपये 50 लाख 51 हजार इतकी आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत कॉकलियर इम्प्लांट,
हृदय प्रत्यारोपण, यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्थिमज्जा
प्रत्यारोपण, हिप प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, औषधोपचार व किरणोपचार, नवजात
शिशूंचे आजार, गुडघा प्रत्यारोपण, डायलिसिस, रस्ते अपघातातील जखमी रुग्ण, जळीत रुग्ण,
विद्युत अपघातग्रस्त रुग्ण तसेच मेंदूविकार व हृदयरोगासंदर्भातील शस्त्रक्रिया यांसारख्या
गंभीर आजारांसाठी मदत दिली जाते.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांच्या
आरोग्य संवर्धनासाठी असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील
सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच गरजू रुग्णांपर्यंत या सुविधांची माहिती
पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
*******
No comments:
Post a Comment