हिंगोली दि.10, (जिमाका): क्रीडा
व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या
कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे,
यासाठी जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर प्रत्येकी एक युवक, युवती
व नोंदणीकृत संस्थेला देण्यात येतो. हा पुरस्कार गौरवपत्र, सन्माचिन्ह, रोख रक्कम दहा
हजार (प्रति युवक व युवतीसाठी), प्रति संस्थेस गौरवपत्र, सन्माचिन्ह, 50 हजार रुपये
रोख रक्कम अशा स्वरुपाचे असेल. सदरचा पुरस्कार हा सन 2025-26 या वर्षासाठी देण्यात येणार आहे.
अर्जदार
युवक-युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च रोजी
35 वर्षांपर्यंत असावे. जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात
सलग 5 वर्षे वास्तव्य असावे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही
तसेच तो मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही. त्यांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे
अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर
किमान दोन वर्षे कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. एका जिल्ह्यात पुरस्कार
प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात
जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार व्यक्तीचे कार्य
हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील
अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यापिठातील
अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक/ कर्मचारी पुरस्कारास पात्र राहणार नाही.
अर्जदाराने
पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्याचा दाखला देणे आवश्यक राहील.
पुरस्कार संस्थेस विभागून दिला जाणार नाही. संस्थेने
वरीलप्रमाणे केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अर्जदार युवक
व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान
दोन वर्षे कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार संस्था सार्वजनिक
विश्वस्त अधिनियम 1860 किंवा
मुंबई पब्लीक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार नोंदणीकृत असावी. अर्जदार संस्था नोंदणी
झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे अनिवार्य आहे. अर्जदार
संस्थेचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी
संस्था राज्यातील अन्य जिल्हात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार
नाही. अर्जदार- संस्थेच्या सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्याचा
दाखला देणे आवश्यक राहील. जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी अर्जाचा विहित नमुना परिपूर्ण
प्रस्तावासह दिनांक 20 एप्रिल 2026पर्यंत या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा
व माहितीसाठी या कार्यालयास संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा
अधिकारी राजेश्वर मारावार यांनी कळविले आहे.
******
No comments:
Post a Comment