हिंगोली, दि. २० (जिमाका): जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल कॅरिअर सेंटर हिंगोली तसेच भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि.२८) रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा रोजगार मेळावा सकाळी १० वाजता भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. कंपनीमार्फत "शिका आणि कमवा" या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
युवकांना तांत्रिक शिक्षणासोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या उद्देशाने "टोयोटा कौशल्य" हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत उमेदवारांना डायरेक्टरेट जनरल ट्रेनिंगच्या सहकार्याने जागतिक दर्जाचे निवासी तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एक वर्ष अप्रेंटशिप आणि त्यानंतर रोजगारासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
उपलब्ध कोर्सेस :
ऑटोमोटीव्ह वेल्ड टेक्निशिएन, ऑटोमोटीव्ह पेंट टेक्निशिएन, ऑटोमोटिव्ह असेम्बली
टेक्निशियन आणि मेकँट्रोनिक्स टेक्निशियन यासाठी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी उमेदवाराचे वय १८ ते २१ वर्षे दरम्यान असावे. किमान शैक्षणिक पात्रता १०वी/१२वी उत्तीर्ण असावी. उंची किमान ५ फूट व वजन किमान ४० किलो असणे आवश्यक आहे. उमेदवार अविवाहित असावा तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे अपेक्षित आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम वर्षासाठी प्रतिमहिना रुपये १५,८१५/- तर द्वितीय वर्षासाठी रुपये १७,६१५/- विद्यावेतन दिले जाणार आहे. यासोबतच राहण्याची व जेवणाची व्यवस्था तसेच २४x७ वॉर्डनद्वारे देखरेख सुविधा उपलब्ध राहणार आहे.
तरी पात्र व इच्छुक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment