हिंगोली (जिमाका), दि. 30: शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर केलेल्या ऑनलाईन अर्जांची नुकतीच तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी 147 अर्ज विद्यार्थी लॉगिनवर त्रुटी पूर्ततेसाठी प्रलंबित आहेत. अर्जांची ऑनलाईन त्रुटी पूर्तता करण्यासाठी रविवार, दि.5 मे 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असल्याचे समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र ठरूनही प्रवेश न मिळालेल्या तसेच निवास, भोजन व इतर सुविधा अभावी पुढील शिक्षण घेण्यास अडचणी येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विविध महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. निर्धारित मुदतीत विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्तता न केल्यास त्यांना पुढील शैक्षणिक सत्रात अर्ज करता येणार नाही तसेच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.
संबंधित विद्यार्थ्यांनी 05 मे 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्जातील त्रुटी पूर्तता करून अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात सादर करावी, असे आवाहन समाजकल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment