खरीप हंगाम पूर्वतयारीसाठी कृषी विभागाची कार्यशाळा संपन्न
हिंगोली(जिमाका), दि. 22 : जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शेतकऱ्यांसह क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये विविध पिकांच्या बीज प्रक्रियेबाबत माहिती, सुधारित बियाण्यांची निवड, बियाण्यांची उगवणक्षमता चाचणी, खतांचा संतुलित वापर, माती परीक्षण, कीड व रोग नियंत्रण तसेच कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पावसाच्या अनियमिततेचा विचार करून स्थानिक हवामान व परिस्थितीनुसार योग्य पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्याचेही सांगण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढ साधावी तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यशाळेस कृषी अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******

No comments:
Post a Comment