21 April, 2026

 जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा


११ आरोग्य संस्था एनकॉस प्रमाणित करा 

एचपीव्ही लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश



हिंगोली, दि. 21 (जिमाका): जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांची आढावा बैठक घेत जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम बनवण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित केलेल्या निर्देशांकाची पूर्तता करून ११ 'आरोग्य संस्था एनकॉस प्रमाणित करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. 

सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाचा व आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय या स्तरावर रेफरलच्या प्रमाणाबाबत लेखा परीक्षण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. त्याच बरोबर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत टीबी मुक्त भारत अभियान, कुष्ठरोग, एनसीडी कार्यक्रमा अंतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग या आजाराच्या स्क्रीनिंगचे काम वाढविण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान बाबत आढावा घेतला व अभियान यशस्वी राबविण्याच्या सूचना दिल्या.

 तसेच एचपीव्ही लसीकरणाचा आढावा घेतला असता १४ वर्षे पूर्ण केलेल्या व १५ वा वाढदिवस न केलेल्या एकूण मुलींची संख्या १०२२५ एवढी आहे, त्यापैकी २७७ मुलींना एचपीव्ही लसीकरण करण्यात आले. एचपीव्ही लसीकरणाचे काम जलद गतीने वाढवावे. यासाठी जास्तीत जास्त लसीकरण सत्र आयोजित करावे व शाळेमध्ये जाऊन समुपदेशन करण्याचे निर्देश देण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेमध्ये गुणात्मक दर्जाच्या आरोग्य सेवा दिल्या जातात, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला पाहिजे, असे काम करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. 

 यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी तथा, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, बालरोग तज्ञ गोपाल कदम, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश्वर कत्रूवार, डॉ. सुनील देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिडुळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन राठोड, डॉ. गंगाधर काळे,, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे , डॉ. डी व्ही. सावंत, डॉ. प्रशांत पुठावर, डॉ. निशांत थोरात, अमोल कुलकर्णी, विजय पाठक शेख मुनाफ आदी  कर्मचारी  उपस्थित होते. 

*****





No comments: