18 April, 2026

विशेष लेख - नारीशक्ती वंदन अभियान : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ठरतेय आधारवड

 


राज्य शासन व केंद्र शासनामार्फत महिला, मुली तसेच बालकांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. नारीशक्ती वंदन अभियानाच्या माध्यमातून या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे तसेच समाजात जनजागृती  निर्माण करणे यावर विशेष भर दिला जात आहे. त्यापैकी महिला व बालकांसाठी  महत्त्वपूर्ण  ठरणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही अनेक गरजू कुटुंबांसाठी दिलासादायक ठरत आहे.

ही योजना विशेषतः अनाथ, निराधार, संकटग्रस्त व वंचित बालकांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी राबविण्यात येत असून एका कुटुंबातील  किमान दोन बालकांना दरमहा प्रत्येकी 2250 रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेचा लाभ 0 ते 18 वर्षे वयोगटातील पात्र बालकांना दिला जातो.

या योजनेंतर्गत अनाथ बालके, एक पालक असलेली बालके, पालकांचा शोध न लागलेली बालके, कुष्ठरोगग्रस्त पालकांची बालके, कुटुंब विभक्तीकरण झालेली बालके, घटस्फोटीत अथवा अविवाहित मातृत्वातील बालके, गंभीर आजारग्रस्त पालकांची बालके, बहुविकलांग बालके, दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके, मतिमंद बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची  बालके, एचआयव्हीग्रस्त बालके, दुर्लक्ष किंवा फेटाळणी झालेली बालके, न्यायालयीन अथवा पोलीस प्रकरणातील  अपवादात्मक  परिस्थितीतील बालके, शाळेत न जाणारे बालकामगार, तुरुंगात असलेल्या पालकांची बालके, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारग्रस्त पालकांची बालके, कौटुंबिक वादग्रस्त कुटुंबातील बालके तसेच कोविड कालावधीत एक किंवा दोन्ही पालक गमावलेली बालके पात्र ठरतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी  अर्जासोबत बालकाचा  जन्म दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, बालकाचे आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बालकासोबत  घरासमोरील फोटो, रेशनकार्ड झेरॉक्स, मृत पालक असल्यास मृत्यू प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र तसेच निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. दोन बालके असल्यास दोन्ही  बालकांचे संयुक्त छायाचित्र दोन प्रतींमध्ये देणे आवश्यक आहे.

अर्जदारांनी या योजनेसाठी अर्ज अंगणवाडी सेविका, संबंधित तालुक्यातील संरक्षण अधिकारी, किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  कार्यालय, हिंगोली येथे विहित नमुन्यात सादर करावा. अर्ज करताना सर्व कागदपत्रांच्या दोन प्रती जोडणे बंधनकारक आहे.

हिंगोली जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एकूण 3 हजार 772  लाभार्थी नोंदणीकृत असून त्यापैकी मार्च 2025 अखेर 2 हजार 937 बालकांना महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या मार्फत डीबीटी प्रणालीद्वारे लाभ वितरित करण्यात आला आहे. उर्वरित 835 बालकांचा लाभ प्रलंबित असून त्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

समाजातील वंचित, निराधार व संकटग्रस्त बालकांना शिक्षण, संरक्षण आणि संगोपनाचा आधार देणारी ही योजना प्रभावीपणे राबविली जात असून नारीशक्ती वंदन अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक पात्र कुटुंबांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.


संकलन :  चंद्रकांत स. कारभारी, 

                             उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली


******

No comments: