हिंगोली(जिमाका), दि. १७ : खत कंपन्यांनी कुठल्याही खताची लिंकींग करून शेतक-यांची अडवणूक करू नये. कंपनीकडून अशा प्रकारची लिंकींग होत असल्यास शेतक-यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. तसे निदर्शनास आल्यास संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली खत विक्रेते, खत विक्रेता संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध खत कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा कृषि विकास अधिकारी अतुल वायसे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी खत कंपन्यांनी सर्व दुकानदारांना खताचे समान वाटप करावे, असे निर्देश दिले. ज्या व्यापाऱ्यांना माल मिळाला आहे आणि ज्यांना मिळाला नाही, याची माहितीही प्रशासनाला देण्याच्या सूचना त्यांनी केल्या
शेतकऱ्यांना वर्षभरासाठी लागणारे संपूर्ण खत एकाच वेळी देऊ नये, याची दुकानदारांनी काळजी घ्यावी. खताचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मागणीचा विचार करून खत विक्री करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
तसेच प्रत्येक खत विक्रेत्याने आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात उपलब्ध खत साठ्याची माहिती व हेल्पलाईन क्रमांक स्पष्टपणे लावावा, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळेल, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
***
No comments:
Post a Comment