19 April, 2026

 विशेष लेख : नारी शक्ती वंदन अभियान 


लेक लाडकी योजना : नारीशक्तीला भक्कम पाठबळ


भारतीय समाजरचनेत मुलगी ही केवळ कुटुंबाची जबाबदारी नसून ती समाजाच्या प्रगतीची, संस्कृतीची आणि उज्ज्वल भविष्याची मजबूत कडी आहे. तरीही अनेक वर्षांपासून मुलींच्या जन्म, शिक्षण, आरोग्य आणि सन्मानाच्या बाबतीत असमानता जाणवत होती. ही दरी कमी करण्यासाठी आणि मुलींच्या सक्षमीकरणाला गती देण्यासाठी राज्य शासनाने १ एप्रिल २०२३ पासून “लेक लाडकी योजना” सुरू केली. ही योजना खऱ्या अर्थाने नारीशक्तीला भक्कम पाठबळ देणारी ठरत आहे.

“लेक लाडकी योजना”चा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांच्या संगोपनासाठी आर्थिक आधार उपलब्ध करून देणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनवणे होय. मुलींबाबत समाजातील नकारात्मक दृष्टिकोन बदलून त्यांना समान संधी मिळवून देणे हा या योजनेचा केंद्रबिंदू आहे. तसेच बालविवाह रोखणे, मुलींचा शाळाबाह्य दर कमी करणे आणि कुपोषणावर नियंत्रण ठेवणे हेही महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

आर्थिक सहाय्याची टप्प्याटप्प्याने रचना


या योजनेअंतर्गत पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते प्रौढत्वापर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते. त्यामध्ये:

मुलीच्या जन्मानंतर  ५ हजार रुपये दिले जातात. तिने इयत्ता चौथीत प्रवेशानंतर ४,००० रुपये,

इयत्ता सहावीत प्रवेश केल्यानंतर ‌६,००० रुपये, इयत्ता अकरावीतील प्रवेशानंतर  ८,००० रुपये तर १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५,००० रुपये असे एकूण सुमारे ₹१ लाख १ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या सहाय्यामुळे मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणे सुलभ होते आणि कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी होतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत:

१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना योजनेचा लाभ मिळतो. दुसऱ्या अपत्यासाठी अर्ज करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थी मुलगी शिक्षणात सातत्य राखणारी असावी. अंतिम लाभ मिळण्यासाठी मुलगी १८ वर्षांपर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

मुलीचा जन्म दाखला, कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र,पालकांचे आधारकार्ड,बँक पासबुकची प्रत, पिवळे/केशरी शिधापत्रिका, शाळेचे प्रमाणपत्र (शिक्षण सुरू असल्याचे), १८ वर्षांनंतर मतदान ओळखपत्र/नोंद व अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र देणे आवश्यक आहे.

शिक्षण व सक्षमीकरणाला चालना


लेक लाडकी योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून ती मुलींच्या शिक्षणाला चालना देणारी आहे. अनेक ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमध्ये मुलींचे शिक्षण अर्धवट सोडले जाते. अशा परिस्थितीत ही योजना पालकांना मुलींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करते. यामुळे भविष्यात शिक्षित, आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासू महिलांची पिढी घडण्यास मदत होते.

सामाजिक बदलाची नवी दिशा ठरत‌ असून, या योजनेमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत आहे. “मुलगी म्हणजे ओझे” ही चुकीची धारणा कमी होत असून “मुलगी म्हणजे घराची शान” ही भावना दृढ होत आहे. मुलींच्या जन्मदरात सुधारणा, बालविवाहात घट आणि शिक्षणाचा वाढता स्तर हे या योजनेचे महत्त्वपूर्ण परिणाम आहेत.

एकंदरीत‌ “लेक लाडकी योजना” ही केवळ आर्थिक मदत देणारी योजना नसून ती नारीशक्तीचा सन्मान करणारी आणि समाजात समानतेची पायाभरणी करणारी पुढाकार आहे. शासनाच्या या उपक्रमाला समाजातील प्रत्येक घटकाने साथ दिल्यास मुलींच्या सक्षमीकरणाचा प्रवास अधिक वेगाने पुढे जाईल.

मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आणि मुलगी घडवा – या त्रिसूत्रीला बळ देणारी आणि नारीशक्तीला खऱ्या अर्थाने सक्षम बनवणारी योजना म्हणजेच लेक लाडकी योजना‌होय.


- प्रभाकर बारहाते 

प्र. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली

*******



No comments: