हिंगोली, दि. २२ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर हळदीचे उत्पादन झाल्याने कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डमध्ये दररोज १०० हून अधिक वाहनांची आवक होत आहे. वाढत्या कृषिमालामुळे बाजार समिती परिसरात जागेची कमतरता, साठवण क्षमतेचा अभाव आणि मूलभूत सुविधांची अपुरी उपलब्धता यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी, व्यापारी व आडती यांच्याशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, जिल्हा वार्षिक योजनेतून बाजार समितीतील आडतीचे बळकटीकरण करण्यात येणार असून, परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. कृषिमालाच्या वाढत्या आवकेमुळे विद्यमान जागा अपुरी पडत असल्याने शेतकऱ्यांचा माल खुल्या जागेत ठेवावा लागत आहे. या समस्येवर उपाय म्हणून साठवण क्षमतेत वाढ, नवीन गोदाम उभारणी तसेच अतिरिक्त जागेचा पर्याय यावर प्रशासन गंभीरपणे विचार करत आहे.
बाजार समितीचे आधुनिकीकरण करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी पुढे सांगितले की, वजनकाटा, लिलाव व्यवस्था, पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छता, निवारा आदी सुविधा अधिक सक्षम करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना माल विक्री प्रक्रियेत सुलभता मिळावी आणि कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कृषिमालाच्या बाजारभावाबाबत उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक प्रशासन दर निश्चित करत नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजारभावातील तफावत किंवा इतर अडचणी वरिष्ठ पातळीवरील संबंधित संस्था, एनसीडीईएक्स किंवा स्पॉट एजन्सीकडे पाठवून त्यावर पाठपुरावा करता येतो.
हिंगोली जिल्हा हळद उत्पादनासाठी महत्त्वाचा मानला जात असून, येथील हळदीला राष्ट्रीय स्तरावर मागणी आहे. त्यामुळे बाजार समितीतील सुविधा सक्षम झाल्यास शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ, चांगला भाव आणि विक्रीसाठी अनुकूल वातावरण मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संत नामदेव हळद मार्केट येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच बाजारातील सुविधा, व्यवस्थापन आणि व्यवहारातील पारदर्शकतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी बाजार समितीचे पदाधिकारी, संबंधित अधिकारी, व्यापारी, आडती व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
****




No comments:
Post a Comment