हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यातून
दरवर्षी किमान एक विद्यार्थी सैनिक स्कूल सातारा येथे व एक विद्यार्थी राष्ट्रीय इंडियन
मिलिटरी कॉलेज येथे प्रवेशित झाला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून
घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.
निपुण भारत अभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्रा.) आसावरी काळे यांच्यासह
विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना
देण्यात येणारी शिष्यवृत्ती जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून अदा करण्याची व्यवस्था करावी,
असे निर्देश देण्यात आले. तसेच विविध प्रश्नसंच तयार करण्यासाठी डायटमार्फत दोन गणित,
दोन इंग्रजी, दोन मराठी व दोन तांत्रिक विषयांचे तज्ज्ञ सदस्य तसेच शिक्षणाधिकारी
(प्रा.) सदस्य सचिव असलेली समिती स्थापन करावी, असे सांगण्यात आले.
या समितीमार्फत टप्प्याटप्प्याने पाच
हजार प्रश्न तयार करावेत. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित
करून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घ्यावी. प्रश्नसंच तयार करण्यासाठी आवश्यक झेरॉक्स
मशीन व ओएमआर मशीन खरेदी करावीत. दिवाळी सुट्यांपूर्वी विद्यार्थ्यांच्या दोन परीक्षा
घेण्यात याव्यात, असे निर्देश देण्यात आले.
या स्पर्धा परीक्षेसाठी दोन हजार विद्यार्थी
आकांक्षित क्षेत्रातील व दोन हजार विद्यार्थी सर्वसाधारण क्षेत्रातील निवडावेत. विद्यार्थ्यांना
अभ्यासाची सवय लावणे व त्यांची गुणवत्ता विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश
असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
दरमहा सुटीच्या दिवशी शनिवार किंवा रविवारी टप्प्याटप्प्याने रेमिडियल क्लासेस आयोजित करावेत. व्हर्च्युअल क्लासरूममधील व्याख्याने युट्युब चॅनलवर अपलोड करावीत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी निश्चित निकष ठरवावेत. तसेच चार हजार विद्यार्थ्यांच्या ट्रॅकिंगची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
*******
No comments:
Post a Comment