हिंगोली, दि.२४ (जिमाका) : महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक आणि सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनविण्यासाठी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे गुरुवार (दि. 30) रोजी सकाळी 10 वाजता नांदेड येथील श्री. शंकरराव चव्हाण सभागृह, विष्णुनगर येथे आयोजन करण्यात आले असून, लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात विविध महामंडळांच्या कर्ज व प्रशिक्षण योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, तसेच अर्ज करताना होणाऱ्या त्रुटी टाळण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय पात्र लाभार्थ्यांना सशर्त हेतुपत्र, मंजुरीपत्र, प्रशस्तीपत्र व पदकांचे वितरण करण्यात येणार असून ट्रॅक्टर, वाहने आदी साधनांचे वाटपही करण्यात येईल.
या कार्यक्रमात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तांत्रिक व आर्थिक मार्गदर्शनाचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील युवकांनी या संधीचा लाभ घेऊन स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सौदारजी झुंझारे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, दर्गा रोड, हिंगोली, किंवा दूरध्वनी 02456-224442 व www.msobcfdc.org वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment