*विशेष वृत्त*
नारी शक्ती अभियान : सुरक्षित मातृत्वासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ठरतेय आधारवड
हिंगोली, दि. 21 (जिमाका): महिलांचे आरोग्य, पोषण आणि सुरक्षित मातृत्व सुनिश्चित करण्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 प्रभावीपणे राबविण्यात येत असून आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. ‘नारी शक्ती अभियानअंतर्गत मातृत्वाच्या काळात महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे व बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दोन टप्प्यांत आर्थिक मदत दिली जाते. पहिल्या अपत्यासाठी एकूण 5 हजार रुपयांची मदत दोन हप्त्यांमध्ये दिली जाते. गर्भधारणेची नोंदणी आणि आवश्यक एएनसी तपासणीनंतर 3 हजार रुपये, तर बाळाच्या जन्मानंतर जन्मनोंदणी व प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यावर 2 हजार रुपये दिले जातात. तसेच दुसरे अपत्य मुलगी असल्यास 6 हजार रुपयांचा लाभ एकाच टप्प्यात देण्यात येतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे, मनरेगा जॉब कार्ड, ई-श्रम कार्ड, किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (गोल्डन कार्ड), बीपीएल शिधापत्रिका, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ, दिव्यांगत्व, अनुसूचित जाती-जमातीतील असणे यापैकी कोणत्याही एक पात्रतेचा पुरावा आवश्यक आहे. तसेच गरोदर व स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्यांनाही या योजनेचा लाभ मिळतो.
लाभार्थींनी अर्ज करताना आधार कार्ड, एएनसी/लसीकरण कार्ड, जन्म दाखला, पात्रतेचा पुरावा आणि आरसीएच क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे. सर्व रक्कम थेट लाभार्थीच्या आधार-संलग्न बँक किंवा पोस्ट खात्यात थेट बँक खात्यात जमा केली जाते.
दरम्यान, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली यांच्या माहितीनुसार सन 2025-26 मध्ये जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतर्गत एकूण 4630 महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून तब्बल 1 कोटी 41 लाख 34 हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली 444, हिंगोली शहर 1014, कळमनुरी 608, सेनगाव 750, वसमत 1021, औंढा नागनाथ 660 आणि आखाडा बाळापूर 133 असे मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत. ही योजना केवळ आर्थिक मदत न देता मातृत्वाबाबत जागरूकता वाढविणे, वेळेवर आरोग्य तपासणी व लसीकरण सुनिश्चित करणे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सुरक्षित मातृत्व, सुदृढ बालक आणि सक्षम महिला यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना हीच खरी नारी शक्तीची बळकटी ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
******

No comments:
Post a Comment