हिंगोली (जिमाका), दि. 28 : आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण
मंत्रालयामार्फत सन 2007-08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
योजना परीक्षा (एनएमएमएस) राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखून त्यांना
इयत्ता 12 वीपर्यंत शिक्षण पूर्ण करता यावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना
इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत चार वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सन 2017-18 पासून
शिष्यवृत्तीचा दर दरमहा 1 हजार रुपये असून वार्षिक 12 हजार रुपये इतका आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
यांच्यामार्फत दि. 28 डिसेंबर 2025 रोजी एनएमएमएस
परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी दि.
24 फेब्रुवारी 2026 रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर
जात, दिव्यांगत्व, जन्मदिनांक आदी बाबींमध्ये आवश्यक दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना
व पालकांना शाळेमार्फत दि. 5 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी देण्यात
आली होती.
विद्यार्थी व पालकांनी शाळेमार्फत सादर
केलेल्या दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची
अंतिम निवड यादी शुक्रवार, दि. 24 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात आली आहे.
दि. 28 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या एनएमएमएस
परीक्षेसाठी राज्यभरातून 2 लाख 50 हजार 745 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात
आली होती. महाराष्ट्र राज्यासाठी शिक्षण मंत्रालय,
नवी दिल्ली यांच्याकडून 11 हजार 682 शिष्यवृत्तींचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.
राज्यातील आरक्षण धोरणानुसार विविध संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
तसेच संबंधित संवर्गामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4 टक्के आरक्षण लागू आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी इयत्ता 7 वी व 8 वी मधील विद्यार्थ्यांची संख्या
तसेच 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणावर जिल्हानिहाय स्वतंत्र कोटा निश्चित
करण्यात आला आहे.
या परीक्षेची निवड यादी व गुण यादी महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in तसेच https://mseenmms.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करण्यात आली
आहे. जिल्हे, शाळा व विद्यार्थ्यांनी निकाल परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच पाहावा,
असे आवाहन करण्यात आले आहे.
शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या
शिष्यवृत्ती वितरणाची प्रक्रिया संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (योजना)
व शिक्षण संचालक (योजना) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिली आहे.
******
No comments:
Post a Comment