हिंगोली(जिमाका), दि.15 : जिल्ह्यातील तसेच राज्यातील काही रेस्टॉरंट, केटरर्स, हॉटेल्स व फास्टफूड विक्रेते अन्नपदार्थ तयार करताना चीज अॅनालॉगचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, याबाबत ग्राहकांना पुरेशी माहिती दिली जात नसल्यामुळे ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींमार्फत प्राप्त झाल्या आहेत.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम-२००६ च्या कलम १८ (२) (०) नुसार ग्राहकांना ते जे अन्न खातात त्याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी अन्नातील घटकांची माहिती मिळणे आवश्यक आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग अँड डिस्प्ले) नियम, २०२० मधील प्रकरण-३ अंतर्गत नियमन ९ (६) नुसार अन्न व्यवसायिकांनी अन्नपदार्थ विक्री करताना त्यातील घटक, पोषणमूल्य व संबंधित माहिती स्पष्टपणे प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.
चीज अॅनालॉगचे उत्पादक व पुरवठादार यांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम-२००६ च्या कलम २३ नुसार अन्नपदार्थाचे पॅकेजिंग व लेबलिंग दिशाभूल करणारे नसावे व अन्नाचे खरे स्वरूप स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. तसेच विक्री बिलावर “चीज अॅनालॉग” असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. पनीर म्हणून चीज अॅनालॉगचा पुरवठा किंवा विक्री केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
तसेच, रेस्टॉरंट, हॉटेल्स, केटरर्स व फास्टफूड विक्रेते यांनी जर चीज अॅनालॉगचा वापर करून अन्नपदार्थ तयार केले असतील, तर त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्यूकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सूचनांची पूर्तता दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत करावी.
निर्धारित कालावधीत सूचनांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम-२००६ व संबंधित नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
******
No comments:
Post a Comment