17 April, 2026

आपले सरकार सेवा केंद्राची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर * उमेदवारांना हरकती सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली(जिमाका), दि. १७ : हिंगोली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी हरकती अथवा आक्षेप असल्यास दि. २० ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली शहरातील ७ केंद्रे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील रिक्त ४२३ केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. अशा प्रकारे एकूण ४३० केंद्रांसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली.

दि. २ जानेवारी २०२६ अखेर प्राप्त झालेल्या एकूण ३१०१ अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या १८६१ उमेदवारांच्या मुलाखती दि. ३ फेब्रुवारी २०२६ ते दि. १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या.

यानंतर दि. ९ मार्च २०२६ रोजी अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावर उमेदवारांना दावे व हरकती सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेच्या आधारे पदवी प्रमाणपत्रांच्या प्रतींसह दावे सादर केले. तसेच तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांविरोधात हरकतीही प्राप्त झाल्या.

एकूण १६१ उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील कागदपत्रे सादर केली. त्यानुसार त्यांना गुणदान करण्यात आले. तसेच प्राप्त ५९ हरकतींवर सुनावणी घेऊन गुणवत्ता व नियमांच्या आधारे निर्णय देण्यात आला. जाहिरातीत नमूद अटी व शर्तींनुसार अपात्र उमेदवारांना अनर्ह ठरविण्यात आले.

या सर्व प्रक्रियेनंतर अंतरिम गुणवत्ता यादीत काही प्रमाणात बदल करण्यात आले असून काही उमेदवारांच्या गुणवत्ता क्रमांकात सुधारणा झाली आहे. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंतिम गुणवत्ता यादीबाबत कोणत्याही उमेदवारास हरकत अथवा आक्षेप असल्यास त्यांनी दि. २० एप्रिल २०२६ ते दि. २२ एप्रिल २०२६ या कालावधीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उमाकांत मोकरे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, आयटी सेल यांच्याकडे अर्ज सादर करावेत.

विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती अथवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. तसेच दि. २२ एप्रिल २०२६ पर्यंत कोणतीही हरकत प्राप्त न झालेल्या केंद्रांबाबत पुढील नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे.

***

No comments: