हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्हा कचेरीतील
विविध शासकीय कार्यालयांमध्ये कर्तव्यावर असताना तंबाखू व गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर
दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 11 जणांकडून एकूण 1880 रुपयांचा दंड वसूल
करण्यात आला.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी
अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार, अधिष्ठाता श्रीचक्रधर मुंगल व जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने ही
कारवाई केली. कोटपा-2003 कायद्याच्या कलम 4 चे उल्लंघन करत कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त
पदार्थांचे सेवन करणे तसेच तंबाखूजन्य पदार्थ सोबत बाळगणे याबाबत 11 कर्मचारी व इतर
व्यक्तींवर आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत 1880 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शासकीय
कार्यालयात तंबाखू-गुटखा सेवनास सक्त मनाई केली असून उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक
कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात येत असून, जिल्हाभरात
अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अचानक
भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे.
त्यामुळे सर्व शासकीय कर्मचारी व नागरिकांनी कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करू
नये तसेच शासकीय कार्यालयात येताना तंबाखू-गुटखा सोबत बाळगू नये, असे आवाहन जिल्हा
तंबाखू नियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे
जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी
मानसशास्त्रज्ञ कुलदीप केळकर व मेडिकल सोशल वर्कर आनंद साळवे उपस्थित होते.
कोटपा कायदा 2003 अंतर्गत
प्रमुख तरतुदी :
कलम 4 : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास
बंदी आहे.
कलम 5 : तंबाखूयुक्त पदार्थांच्या प्रत्यक्ष
व अप्रत्यक्ष जाहिरातीस बंदी आहे.
कलम 6 (अ) : 18 वर्षांखालील व्यक्तींना
तंबाखू विक्री करणे किंवा त्यांच्याकडून विक्री करून घेणे दंडनीय गुन्हा आहे.
कलम 6 (ब) : शैक्षणिक संस्थांच्या 100
मीटर परिसरात तंबाखू विक्रीस बंदी आहे.
कलम 7, 8, 9 : तंबाखू उत्पादने पॅकेटवर
85 टक्के भागावर वैधानिक इशारा आवश्यक आहे.
******

No comments:
Post a Comment