11 June, 2026

हिंगोली येथे कमोडिटी जागरूकता कार्यशाळा संपन्न · शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना वायदा बाजार, गुणवत्ता निकष व किंमत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

 




 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओ) वायदा बाजाराची माहिती, हळदीच्या गुणवत्ता-आधारित व्यापाराची संकल्पना आणि बाजारपेठेतील संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय कमोडिटी जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत सुमारे 150 शेतकरी, एफपीओ प्रतिनिधी, कृषी उद्योजक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विविध घटकांनी सहभाग नोंदविला.

या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अविनाश लहाने, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड तसेच ललित बहाले, गुणवंत पाटील हंगरगेकर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील प्रमुख हळद उत्पादक क्षेत्रांपैकी असलेल्या मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना कमोडिटी बाजारपेठेची माहिती थेट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेत बाजारपेठेतील किंमत निर्धारण, बाजारातील चढ-उतार आणि जोखीम व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या कार्यशाळेदरम्यान शेतकऱ्यांना मंडई व एक्सचेंजमधील किमतींतील फरक, किमतींच्या निर्धारणामागील घटक तसेच किंमतीतील चढ-उतारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी उपलब्ध साधनांची माहिती देण्यात आली. याशिवाय वायदा बाजाराविषयी असलेले गैरसमज दूर करणे, किंमत ठरविण्याचे फायदे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पूरक ठरणाऱ्या पर्यायी बाजारपेठा, मालगोदाम व्यवस्था, गुणवत्ता निकष आणि आधार केंद्रांच्या उभारणीसंदर्भातील बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.

कृषी कमोडिटी विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांच्या मध्यस्थीखाली झालेल्या पॅनेल चर्चेत वायदा बाजाराची कार्यपद्धती, नियामक तरतुदी आणि बाजारातील व्यवहार प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच एफपीओ प्रमुख सूर्यजी शिंदे यांनी हळद वायदा बाजार आणि ऑप्शन्स करारांमधील स्वतःचा अनुभव सहभागींसमोर मांडला. गुणवत्ता निकष, वाहतूक खर्च, विक्री खर्च आणि व्यवहाराची वेळ स्वतः ठरवून बाजारपेठेतील संधींचा कसा लाभ घेता येतो, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या माध्यमातून एफपीओंना उपलब्ध असलेल्या आर्थिक सहाय्य योजनांची माहितीही देण्यात आली. यामध्ये तपासणी खर्चाची 100 टक्के परतफेड तसेच स्वच्छता, वर्गवारी, वाळवणे आणि वाहतूक खर्चाच्या 75 टक्क्यांपर्यंत परतफेडीची तरतूद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एक्सचेंज-आधारित व्यवहारांमध्ये शेतकरी गटांचा खर्च कमी होण्यास मदत होत असल्याचे नमूद करण्यात आले.

शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी (एफपीओ) आधुनिक बाजारपेठेतील संधींचा लाभ घेण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

अधिक माहितीसाठी www.ncdex.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनसीडीईएक्सच्या किसान कॉल सेंटरशी 1800-103-4861 या क्रमांकावर  व एनसीडीईएक्सचे स्थानिक प्रतिनिधी रोहन धांडे (मो. 9130897105) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

******

No comments: