15 June, 2026

अमृतच्या पाच दिवसीय कर्मचारी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संपन्न

 


हिंगोली (जिमाका), दि. १५ : समाजातील सर्व घटकांची उन्नती करणे हे शासनाचे कर्तव्य असून कोणताही वर्ग विकासापासून वंचित राहिल्यास संपूर्ण समाज दुर्बल होतो. समाजाच्या उन्नतीबरोबरच चारित्र्यनिर्माणालाही तितकेच महत्त्व आहे. व्यक्तीनिर्माणातून चारित्र्यनिर्माण आणि त्यातून राष्ट्रनिर्मिती घडते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या पाच दिवसीय कर्मचारी प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतातील प्रत्येक नागरिक सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘राष्ट्रप्रथम’ या भावनेने कार्य करताना स्वदेशी, स्वभाषा, संस्कृती आणि बचत या मूल्यांचा अंगीकार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमृतचे प्रतिनिधी म्हणून कर्मचारी नव्हे तर कार्यकर्ता या भावनेतून काम केल्यास व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्मितीचे ध्येय साध्य होईल, असे सांगून कामातून माणसे जोडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच प्रत्येकाने आपल्या कार्याची गुणवत्ता आणि व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रास्ताविकात संस्थेची स्थापना, आतापर्यंतचा संघर्षमय प्रवास आणि प्रगतीचा आढावा घेतला. राज्यभरातील अनेक संस्थांकडून अमृतच्या कार्याची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रशिक्षण शिबिरांमधून नवीन कौशल्ये, उपक्रम आणि कल्पना आत्मसात करून अधिक जबाबदारीने व कार्यक्षमतेने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने झाली. औंध येथील अमृतच्या मुख्यालयात आयोजित या निवासी प्रशिक्षण शिबिरात राज्यातील विविध जिल्ह्यांतील अमृत व्यवस्थापक, अमृत मित्र आणि अमृत सखी सहभागी झाले आहेत. हे शिबिर दि. १४ जून ते १८ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

*******

No comments: