·
'गोजातीय प्रजनन व नियमन'
विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
हिंगोली
(जिमाका), दि. 2 : राज्यातील खासगी कृत्रिम रेतन
सेवादात्यांनी त्यांच्या कामाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक असून,
या माध्यमातून राज्यातील पशुवैद्यकीय सेवांची संख्यात्मक व अद्ययावत माहिती उपलब्ध
होण्यास मदत होणार आहे. परिणामी, पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा आणि गुणवत्ता अधिक प्रभावीपणे
वृद्धिंगत होईल, असे प्रतिपादन आयुक्त पशुसंवर्धन तथा अध्यक्ष, महाराष्ट्र गोजातीय
प्रजनन व नियमन प्राधिकरण डॉ. किरण पाटील यांनी केले.
औंध येथील
पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनू सभागृहात 'गोजातीय प्रजनन व नियमन' या विषयावर एकदिवसीय
राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या या कार्यशाळेस विविध तज्ज्ञ अधिकारी, खासगी सेवा पुरवठादार व संस्थांचे प्रतिनिधी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र
गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करणे हा कार्यशाळेचा
मुख्य उद्देश होता. यासोबतच कृत्रिम रेतन सेवा, नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन अंतर्गत
डिजिटल ट्रॅकिंग, तांत्रिक एकत्रीकरण तसेच राज्य व केंद्र शासनाच्या भविष्यकालीन धोरणांवर
सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त
व प्राधिकरणाचे सदस्य डॉ. देवेंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी
मार्गदर्शन करताना डॉ. किरण पाटील यांनी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांच्या
प्रभावी अंमलबजावणीसाठी कृत्रिम रेतन सेवा आणि एनडीएलएम आधारित डिजिटल ट्रॅकिंग अत्यावश्यक
असल्याचे सांगितले. राज्यामध्ये उच्च उत्पादनक्षम पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी कृत्रिम
रेतन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने काम करावे
आणि विभाग त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यशाळेच्या
उत्तरार्धात विविध संस्थांच्या तज्ज्ञांनी तांत्रिक सादरीकरणे केली. बायफ, पुणे येथील
डॉ. जयंत खडसे यांनी गोजातीय पैदाशीत बायफच्या अनुभवांवर प्रकाश टाकला. चितळे-एबीएस
जेनस प्रा. लि. चे डॉ. परिक्षित देशमुख यांनी 'जेनोमिक्स आणि सेक्स्ड सीमेन' या आधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर करून गोवंश उत्पादकता व पैदास सुधारण्याविषयी सविस्तर माहिती दिली.
भारत
पशुधन प्रणालीची उपयोगिता व वापर याबाबत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
डॉ. राजू कोलते यांनी उपस्थित खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांना मार्गदर्शन केले. तांत्रिक
सत्रानंतर उपस्थित प्रतिनिधी व अधिकाऱ्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन अभिप्राय
घेण्यात आले.
कार्यक्रमाचा
समारोप उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तथा महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाचे
सदस्य सचिव डॉ. प्रशांत भड यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
******
No comments:
Post a Comment