20 June, 2026

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी छपाईची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पाहणी

 





हिंगोली(जिमाका), दि. २० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आवश्यक मतदार यादी छपाईचे काम सुरू असून, या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज संबंधित प्रिंटींग प्रेसला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार यादी छपाई प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. छपाईचे काम अचूक, त्रुटीमुक्त व वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना व प्रिंटींग प्रेसच्या प्रतिनिधींना दिल्या. मतदार यादीतील माहितीची गोपनीयता, गुणवत्तापूर्ण छपाई आणि निर्धारित कालमर्यादेचे काटेकोर पालन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असून, नवमतदारांची नोंदणी, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच आवश्यक दुरुस्त्या करण्याचे कामही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर छापील मतदार यादीची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असून, त्याद्वारे नागरिकांना मतदार यादीतील तपशील पडताळण्यास सुलभता होणार आहे.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी छपाईच्या विविध टप्प्यांची पाहणी करून कामाची गती व गुणवत्ता समाधानकारक असल्याचे नमूद केले. तसेच मतदार यादी पुनरीक्षणाचे काम पारदर्शक, अचूक व वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश दिले.

यावेळी निवडणूक शाखेचे अधिकारी, संबंधित कर्मचारी तसेच प्रिंटींग प्रेसचे प्रतिनिधी उपस्थित होते.

*******

No comments: