26 June, 2026

स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून नागेश्वर विकास आराखडा तयार करावा - पालकमंत्री नरहरी झिरवाळ


•पालकमंत्र्यांनी घेतला आढावा


हिंगोली, (जिमाका) दि. २६ : जिल्ह्यातील ८ वे ज्योर्तिलिंग असलेल्या दारुकावने श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील नागेश्वर मंदिराचा १८२.८३ कोटी रुपयांचा बृहद विकास आराखडा तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच येथील जुणे जाणकार यांच्याशी चर्चा करून त्यानुसार विकासकामे हाती घेण्याच्या सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना केल्या.


औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राला 'अ' वर्ग दर्जाची मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरु असून, येथील राज्य शासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व विभागामार्फत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, त्याचा पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. 


यावेळी खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, नूतन पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, विभागीय सहआयुक्त (नियोजन) सुनील सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती अनिता लव्हारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुदेश देशमुख, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी जी. जी. चितळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.चव्हाण उपस्थित होते. 


पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी औंढा नागनाथ बृहद विकास आराखड्याचे उत्तम नियोजन केले असून, यानुसार कामे झाल्यास मंदिर परिसराचा कायापालट होईल, असे सांगत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे विशेष कौतुक केले. येथील विकासकामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना, तसेच येथील जुने जाणकारांना विश्वासात घेऊन कामे करावीत, अशाही सूचना दिल्या. 


 यावेळी खासदार रामराव वडकुते यांनी मंदिर परिसराचा विकासकामे करताना येथे देशातील १२ ज्योतिर्लिंगांचे नागेश्वराच्या भक्तांना दर्शन व्हावे. त्यासाठी दर्शनरांगेत भक्त असताना बाजूच्या भिंती अथवा दर्शनी भागात ते दिसतील, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. 


जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी १८२.८३ कोटी रुपयांतून तयार होणा-या औंढा नागनाथ बृहद विकास आराखड्यातील नियोजनानुसार माहिती देताना येथील संकल्पचित्रानुसार विकासकामे होतील, असे सांगितले. प्रस्तावित संकल्पचित्रानुसार आतापर्यंत उच्चाधिकार समितीकडे तीन आढावा बैठका झाल्याची माहिती त्यांनी दिली. येथील सर्व विकास कामे ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय पुरातत्व विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे सांगून दारुकावने येथील पौराणिक महत्त्व त्यांनी विशद केले. 


येथे येणा-या भक्तांसाठी उच्च दर्जाच्या सोयीसुविधा असणारी दर्शनरांग, भक्त निवास, वाहनतळ, व्हीआयपी भक्त निवासाचे बांधकाम करण्यात येणार असून, मंदिर परिसरातील अतिक्रमित दुकाने हटविली आहेत. तसेच येथे नवीन ५६ दुकाने नव्याने बांधण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.

श्रावण महिन्यात भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता, तात्काळ किंवा कमीत कमी वेळात दर्शन करून देण्याबाबतची योजनाही त्यांनी सांगितली. मंदिर परिसरात यापुढे पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असे सांगून, भक्तांना रांगेतूनच मंदिराच्या शिखराचे दर्शन होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांना सादरीकरणातून सांगितले.


मंदिरातील कचरा व्यवस्थापन, घाण साचणार नाही, तसेच मंदिराच्या गाभा-यात खेळती हवा राहील, याची काळजी घेण्यात येणार आहे. तसेच रुद्राभिषेक व तिकीट काउंटरची व्यवस्था आणि तब्बल ५ हजार भक्त दर्शनरांगेत बसू शकतील, त्यांची प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.


 *भक्तांना येणार 'दारुकावने'चा फील*


मंदिर परिसरात भक्तांनी दर्शन केल्यानंतर मूळ दारुकावनेत विसावलेल्या नागेश्वर मंदिर परिसरात त्यांना दारुकावनेत असल्याचा फिल येईल, असा स्थानिक जातीच्या वृक्षराजीने मंदिर परिसर विकसित करण्यात येईल. तसेच चालुक्य कालीन दरवाजे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी  नागेश्वर मंदिरात संरक्षणास्तव ठेवलेले स्तंभही येथे संरक्षित करण्यात येणार आहेत. भक्तांच्या संरक्षणार्थ दोन पोलीस चौकी, चप्पल स्टँड, प्रतिक्षालय, दर्शन मंडप, विशेष पूजा, अभिषेक आणि दर्शनरांगेत असताना भाविकांना पूर्णवेळ नागेश्वराचे मुखदर्शन होईल, असे नियोजित आहे. येथे मूर्तिसंग्रहालयही विकसित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले. 

तसेच मूळ मंदिराभोवती इतर जवळपास १९ मंदिरे असून, ती विकसित करण्यात येतील. हरिहर कुंडालाही पुनर्जीवित व मंदिर संवर्धित करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. 

*****


No comments: